सातारा : उमेदीच्या काळात कसून केलेला व्यायाम आणि त्याला चौरस आहाराची दिलेली जोड यामुळे आजही वयाच्या 100 या वर्षांमध्ये मी तंदुरुस्त आहे. या शताब्दी वर्षांमध्ये अनेक स्वप्न पूर्ण झाली, काही स्वप्न बाकी आहेत. मात्र या जीवनामध्ये मी कृतकृत्य आहे, अशा प्रामाणिक भावना सातारा येथील तालीम संघ मैदानाचे प्रमुख मार्गदर्शक व महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार यांनी व्यक्त केल्या. यावेळी त्यांनी अनेक आठवणी पत्रकारांजवळ उलगडल्या.
साहेबराव पवार यांचे 15 सप्टेंबर रोजी शंभराव्या वर्षात पदार्पण होत आहे. यानिमित्ताने साहेबराव पवार मित्र समूहाच्या वतीने येथील तालीम संघ मैदानावर शुभेच्छा तसेच जीवनसंग्रहपट प्रदर्शन, स्नेहभोजन आणि विविध कार्यक्रमांचा शुभारंभ असे भव्य आयोजन करण्यात आले आहे. हे नियोजन त्यांचे चिरंजीव राष्ट्रवादीचे नेते दिपकराव पवार आणि सुधीर पवार यांनी केले आहे. येथील निवासस्थानी झालेल्या अनौपचारिक गप्पांमध्ये साहेबराव पवार यांनी आपल्या आठवणी उलगडल्या.
ते म्हणाले, शरीराला मी कधी वाईट वळण लागू दिले नाही. आमच्या लहानपणी तंदुरुस्त माणसांचा सहवास असायचा. त्यातून व्यायामाचे वेड लागले. तब्बल 40 वर्ष जोर बैठका व्यायाम तसेच चौरस आहार पैलवानाचा खुराक याचे सातत्य होते. म्हणून आजही माझी तब्येत 100 व्या वर्षीही ठणठणीत आहे. आजच्या पैलवानांनी स्वप्नांच्या मागे धावताना शरीराची तंदुरुस्ती ठेवली पाहिजे. तसेच पैलवानकी झाल्यानंतर आयुष्यात आर्थिक साक्षर राहणे करता शिक्षण घेणे गरजेचे आहे. ते शिक्षण पूर्ण करून त्यांनी वेगवेगळ्या व्यवसायात पदार्पण होऊन यशस्वी व्हावे, असा सल्ला साहेबराव पवार यांनी दिला.
साहेबराव पवार हे जावली पंचायत समितीचे बारा वर्ष सभापती होते. सातारा नगरपालिकेमध्येही त्यांनी आणि त्यांच्या पार्टीने बराच कार्यकाळ अनुभवला. याबाबतच्या बर्याच आठवणी त्यांनी यावेळी उघड केल्या. ते म्हणाले, मी कधीही प्रसिद्धीचा हव्यास धरलेला नाही. तालमीमध्ये आम्ही कुस्त्या मोफत लावल्या. त्यातून अनेक पैलवान घडवले. माझ्या गेल्या सहा दशकाच्या कारकिर्दीमध्ये साडेतीन हजारहून अधिक पैलवान मी घडवले असून यामध्ये सात महाराष्ट्र केसरी व 12 उपमहाराष्ट्र केसरी आहेत. तालीम संघ हा माझा श्वास आहे आणि येथे कुस्तीचे मोफत प्रशिक्षण देणे त्यातून सातार्याचे नाव उंचवणारे उत्तमोत्तम पैलवान घडवणे हेच माझे खरे स्वप्न आहे. तालीम संघ मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभे रहावे आणि सातार्याच्या पैलवानांना एक व्यासपीठ मिळावे हे माझे खरे स्वप्न असल्याचे पवार यांनी सांगितले. या कामासाठी राज्य शासनाने पाच लाख रुपये यापूर्वी दिले होते. प्रत्यक्षात कामासाठी पावणेचार कोटींची गरज असून पैकी तालीम संघ मैदानाच्या कार्यकारणीवर स्वतः पालकमंत्री शंभूराज देसाई हे आहेत त्यांनी डीपीसी मधून दीड कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. त्यातूनच संरक्षक भिंत, प्रेक्षा गॅलरी तसेच तालीम संघ मैदानाचा आखाडा आणि मॅटवर चालणारी कुस्तीचे केंद्र, पैलवानांसाठी चेंजिंग रूम तसेच विविध सुविधांनी युक्त असे कुस्ती प्रशिक्षण केंद्र लवकरच उभे राहत आहे. याबाबतची माहिती दीपक पवार यांनी दिली.
चौरस आहार व व्यायाम हीच शताब्दी वर्षाची गुरुकिल्ली
आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी पाठपुरावा; महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष साहेबराव पवार यांनी व्यक्त केल्या भावना
by Team Satara Today | published on : 11 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा