सातारा : सातारा जिल्ह्यातील भुईंज येथील किसनवीर सहकारी साखर कारखान्याकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांची थकबाकी अद्यापही न दिल्याने नाराजी वाढत आहे. रयत क्रांती संघटनाच्या वतीने कारखाना प्रशासनाला निवेदन देत चार ते पाच दिवसांत गळीत हंगाम 2025-26 मधील एफआरपी (FRP) व जाहीर दराची संपूर्ण रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेचे संस्थापक सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा युवक अध्यक्ष प्रकाश साबळे यांनी हे निवेदन सादर केले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, अनेक शेतकऱ्यांचा ऊस गाळप होऊन तीन महिने उलटूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
यासंदर्भात कारखाना प्रशासनाने ऊस नियंत्रण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. जर येत्या चार ते पाच दिवसांत शेतकऱ्यांची थकबाकी त्यांच्या खात्यावर जमा केली नाही, तर रयत क्रांती संघटना संबंधित शेतकऱ्यांसह कारखान्याच्या कार्यस्थळावर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
या निवेदनाची प्रत भुईंज पोलीस ठाण्यासही देण्यात आली असून, संभाव्य आंदोलनाची जबाबदारी कारखाना प्रशासनावर राहील, असे संघटनेने स्पष्ट केले आहे.