नकली नोटा ओळखण्याबाबत डी. जी. कॉलेजतर्फे जनजागृती अभियान; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

by Team Satara Today | published on : 01 August 2026


सातारा : आर्थिक व्यवहारांमधील वाढत्या फसवणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांना असली आणि नकली चलनी नोटांमधील फरक स्पष्ट व्हावा, या उद्देशाने येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभागाने विशेष जनजागृती अभियान राबविले. या अभियानाला सातारकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

​या अभियानादरम्यान विद्यार्थ्यांनी व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून भारतीय चलनी नोटांवरील विविध सुरक्षा वैशिष्ट्यांची माहिती दिली. चलनी नोटेवरील वॉटरमार्क, सुरक्षा धागा, सूक्ष्म अक्षरे, महात्मा गांधींचे प्रतिचित्र, रंग बदलणारी शाई आणि दृष्टिहीनांसाठी असलेल्या विशेष खुणांची ओळख कशी पटवावी, याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. तसेच संशयास्पद नोट आढळल्यास कोणती काळजी घ्यावी आणि कायदेशीर प्रक्रिया काय असावी, याविषयीही जागरूक करण्यात आले.

​या उपक्रमाबाबत माहिती देताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण आंधळे यांनी, केवळ पदवी मिळविण्यापेक्षा समाजोपयोगी ज्ञानाची देवाणघेवाण करणारे विद्यार्थी घडविणे हे महाविद्यालयाचे प्रमुख ध्येय असल्याचे सांगितले. अर्थशास्त्र व बँक मॅनेजमेंट विभाग विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासोबतच सामाजिक भान जपणारे उपक्रम सातत्याने राबवत असल्याचे त्यांनी नमूद केले.

​वर्गखोलीतील ज्ञानाचा उपयोग समाजाच्या हितासाठी व्हावा, या भूमिकेतून गेल्या पाच वर्षांपासून विभागामार्फत आर्थिक साक्षरता, डिजिटल बँकिंग, सायबर सुरक्षा आणि ग्राहक जनजागृती या विषयांवर उपक्रम राबविले जात असल्याचे विभागप्रमुख प्रो. डॉ. विजय कुंभार यांनी स्पष्ट केले. तरुणांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना निर्माण करणे हा यामागचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

​या अभियानामुळे विद्यार्थ्यांमधील संवादकौशल्य आणि नेतृत्वगुणांना वाव मिळाला, तर नागरिकांना आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित करण्यासाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. अभियानाच्या यशस्वीतेसाठी उप-प्राचार्य प्रो. डॉ. गणेश जाधव, डॉ. राजशेखर निल्लोलू, डॉ. विजय पाटील, प्रा. श्रीकांत गंगावणे, प्रा. रोहिणी भोसले, प्रा. अजित यादव, प्रा. साजीया हुसेन, प्रा. वेदांतिका कदम, प्रा. प्राजक्ता कुंभार, प्रा. रोहिणी धाइंजे, प्रा. निकिता जाधव, प्रा. धनश्री छप्परकर आणि प्रा. स्वप्नाली अवताडे यांच्यासह विभागातील प्राध्यापकांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांच्या या विधायक उपक्रमाचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरणाचे ६ दरवाजे ६ फुटांवर; नदीपात्रात ३३ हजार क्युसेकने विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

संबंधित बातम्या