गोडोली नाक्यावर वाहतुकीचा विस्फोट; वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी स्वत: सूत्रे हाती घेत फोडली वाहतूक कोंडी

by Team Satara Today | published on : 31 July 2026


सातारा : आज दि. 31 रोजी दुपारी गोडोली नाका परिसरात वाहनचालकांना वाहतुकीचा विस्फोट अनुभवायला मिळाला. मात्र, याबाबतची माहिती समजताच सातारा शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी स्वत: सूत्रे हाती घेत ही वाहतूक कोंडी फोडली. 

याबाबत अधिक माहिती अशी, सातारा शहराच्या पूर्व प्रवेशद्वारावरील गोडोली नाका परिसरात शुक्रवारी दुपारी अचानक वाहतुकीचा प्रचंड ताण निर्माण झाल्याने संपूर्ण परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. दुपारी 1 ते 2.30 या कालावधीत गोडोली जकात नाका, वाय.सी. कॉलेज मार्ग, साईबाबा मंदिर चौक आणि ग्रेड सेपरेटर परिसरात वाहने संथ गतीने सरकत होती. त्यामुळे वाहनचालकांना तब्बल दीड तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. 

वाहतूक कोंडीची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक (वाहतूक) राजेश माने यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत सर्व वाहतूक अंमलदारांना विविध चौकांमध्ये तैनात केले. स्वतःही त्यांनी रस्त्यावर उतरून वाहतुकीचे नियमन हाती घेतले. विविध दिशांमधून येणार्‍या वाहनांचा प्रवाह टप्प्याटप्प्याने सुरू ठेवत वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न करण्यात आले. पोलिसांच्या तत्पर नियोजनामुळे सुमारे दीड तासांच्या प्रयत्नांनंतर वाहतूक हळूहळू पूर्वपदावर आली.

गोडोली नाका हा पुणे, कराड, कोरेगाव तसेच राष्ट्रीय महामार्गावरून सातारा शहरात प्रवेश करणार्‍या वाहनांसाठी प्रमुख मार्ग असल्याने येथे दिवसभर मोठी वर्दळ असते. त्यातच शालेय वाहने, एसटी बस, खासगी प्रवासी वाहने, मालवाहतूक आणि स्थानिक वाहनांची एकाच वेळी होणारी गर्दी यामुळे पीक अवर्समध्ये वाहतुकीचा ताण अधिक वाढत आहे.

विशेषतः साईबाबा मंदिर चौक हा वाहतुकीच्या दृष्टीने ‘बॉटलनेक’ ठरत असून, या ठिकाणी वारंवार कोंडी होत असल्याने नागरिक, विद्यार्थी आणि नोकरदारांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वाहतूक खोळंब्याचा फटका रुग्णवाहिका व इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही बसत असल्याने कायमस्वरूपी उपाययोजनांची मागणी अधिक तीव्र झाली आहे.

वाहतूक पोलिसांनी प्रसंगावधान राखत परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी गोडोली नाका परिसरातील वाढत्या वाहनभाराचा विचार करून चौकांचे नियोजन, सिग्नल यंत्रणेचा समन्वय, अतिक्रमणांवर कठोर कारवाई आणि गर्दीच्या वेळेत अतिरिक्त मनुष्यबळाची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात पावसाची शंभरी पार; सरासरीच्या १०३.४ टक्के वर्षाव
पुढील बातमी
जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ; नऊ जणांविरुद्ध गुन्हा

संबंधित बातम्या