बारामती : आज सकाळी बारामतीत जळोची येथे ईडीने छापेमारी केल्याची माहिती आहे. कोट्यावधीचा परताव्याचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या आनंत सतीश लोखंडे आणि विद्या सतीश लोखंडे यांच्या घरावर ईडीने छापा मारला. लोखंडे यांनी डेअरी प्रोडक्टमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली मंत्रालयातील मोठ्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याची माहिती आहे.
आनंत लोखंडे यांच्यावर मुंबई आर्थिक गुन्हे शाखेत कोट्यावधीची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्यांनी अनेक दूध व्यावसायिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. लोखंडे विद्यानंद डेअर प्रा. ली कंपनीच्या नावाखाली फसवणूक करत होते. तब्बल 10 कोटी 21 लाखांच्या फसवणुकी प्रकरणी त्यांच्यावर अंबोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
आनंत लोखंडे हे आपण मोठ्या मंत्र्यांच्या, राजकीय नेत्यांच्या खूप जवळचे असल्याचे भासवत होते. त्यातून ते गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून कोट्यावधीची गुंतवणूक घेत होते. या प्रकरणी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असतानाच ईडीने देखील छापेमारी करत लोखंडे यांच्या भोवती फास आवळल्याची चर्चा आहे. लोखंडे यांनी छत्तीसगडमधील पार्थी शंकर नाथानी यांच्याशी संपर्क करून 25 मेट्रीक टन गायीचे लोणी खरेदीचे अमिष दाखवले. त्यांच्याकडून माल उचलला मात्र त्यांना पैसे दिले नाहीत. पार्थी शंकर नाथानी यांची तब्बल एक कोटी चार लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी छत्तीसगड गुन्हे शाखेकडे गुन्हा ताखल करण्यात आला होता.