महाबळेश्वर : महाबळेश्वर शहरापासून एक किलोमीटर अंतरावरील फळणे वस्ती लगत तापोळा मुख्य रस्ता मुसळधार पावसामुळे पूर्णपणे खचल्याने तापोळा खोऱ्यातील १०५ हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा महाबळेश्वरशी संपर्क तुटला आहे. रस्ता खचल्याची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. तहसीलदार सचिन मस्के, नगराध्यक्ष सुनील शिंदे तसेच नगरसेवकांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. नागरिकांना पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. गेल्या १० ते १२ दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, अनेक ठिकाणी रस्ते खचणे, दरडी कोसळणे आणि वाहतूक ठप्प होण्याच्या घटना घडत आहेत. यंदा जून महिन्याचा पहिला पंधरवडा कोरडा गेला होता. मात्र जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने रौद्ररूप धारण केले. १ जून ते ९ जुलै या कालावधीत केवळ ४७०.२८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर अवघ्या सहा दिवसांत ५० इंच, तर पुढील आठवड्यात तब्बल ९५ इंच पावसाची भर पडली. त्यानंतरही दररोज सरासरी ३ ते ४ इंच पाऊस कोसळत असून, महाबळेश्वरने यंदा १५० इंचांच्या पर्जन्यमानाचा टप्पा गाठला आहे.
फळणे वस्ती येथील रस्ता पूर्णपणे खचल्याने प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे काम सुरू केले आहे. खचलेल्या रस्त्यालगत असलेल्या भुईमिया बंगल्याच्या परिसरातून लहान वाहनांसाठी तात्पुरता मार्ग तयार करता येईल का?, याची पाहणी करण्यात आली. तसेच कारवी आळा–फळणे वस्ती मार्ग वाहतुकीसाठी खुला करता येईल का?, याबाबतही प्रशासनाकडून चाचपणी सुरू आहे.
यावेळी तहसीलदार सचिन मस्के, नगराध्यक्ष सुनील शिंदे, नगरसेवक तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. नागरिकांचा संपर्क लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. याचबरोबर ग्लेन ओगल धरणावरील तापोळा रस्त्यावरील एकमेव पूल धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. दरवर्षी रस्ता खचणे आणि पुलाची दुरवस्था यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, केळघर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळल्याने सातारा-मेढा मार्गे महाबळेश्वरकडे जाणारी वाहतूक तब्बल १५ तास ठप्प झाली होती. प्रशासनाने रस्ता हलक्या वाहनांसाठी खुला केला असला, तरी मोठ्या वाहनांसाठी हा मार्ग अद्याप बंद आहे.
कचरा पाचगणी डेपोमध्ये हलविण्याचा निर्णय
महाबळेश्वर शहराचा घनकचरा डेपो तापोळा रस्त्यालगत असल्याने रस्ता खचल्यामुळे शहरातील दैनंदिन कचरा डेपो पर्यंत पोहोचविणे अशक्य झाले आहे. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस महाबळेश्वर शहरातील कचरा पाचगणी येथील डेपोमध्ये टाकण्यात येणार आहे, अशी माहिती नगरसेवक संजय जंगम यांनी दिली. रस्ता सुरळीत झाल्यानंतर पूर्ववत तापोळा डेपोमध्ये कचरा नेण्याची व्यवस्था सुरू केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.