सातारा : ऐतिहासिक मोती तलावाचा परिसर पानवेलींनी झाकला गेला असून त्यामुळे येथे अस्वच्छता वाढली आहे. लोकप्रतिनिधी खासदार उदयनराजे भोसले यांच्या निवासस्थानासमोरील या परिसरात अस्वच्छतेचे साम्राज्य असून या वेलींचे निर्मूलन करणे गरजेचे असताना वृक्ष विभागाचे आळमटळम सुरू आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराचे या कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष असून याबाबत तीव्र संताप व्यक्त होत आहे.
सातारा शहराची शुक्रवार पेठ ही खासदार उदयनराजे भोसले यांचे जलमंदिर आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे सुरुची निवासस्थानामुळे राजकीयदृष्ट्या महत्त्वाची आहे. याच दोन्ही निवासस्थानाच्या मधोमध मरीआई मातेच्या मंदिरासमोर ऐतिहासिक मोती तळे आहे. या तळ्याच्या समोर प्रतापसिंह भाजी मंडई कडून येणारा मोठा ओढा आहे. या मोती तळ्याला सध्या पानवेलींनी ग्रासले आहे. या पानवेली मुळापासून काढण्यासाठी सध्या वृक्ष विभागाला वेळ नाही. या विभागाचे प्रमुख सुधीर चव्हाण हे कार्यक्षम अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली या विभागाचा कारभार सुधारलेला आहे. प्रस्ताव प्राप्त वृक्ष छाटणीचे अर्ज प्राप्त झाल्यानंतर त्याचे निर्मूलन काही दिवसातच होत असल्याने पालिका प्रशासनाचा झपाटा दिसून येतो.
मात्र वृक्ष विभागाने नेमलेले ठेकेदार झोपा काढत असल्याची चर्चा आहे. बर्याच ठिकाणच्या पानवेली, अनावश्यक गवत काढणे गरजेचे असताना शुक्रवार पेठेमध्ये अस्वच्छतेची बजबजपुरी वाढली आहे. ठेक्यावरचे सफाई कामगार नक्की काय काम करतात, हे समजायला मार्ग नाही. मल्हार पेठेतील हा ठेकेदार राजकीय प्रभावातूनच पुढे आलेला आहे. सातारा पालिकेत सोम्या-गोम्याच्या नावाने टेंडर भरून त्याचे लाभ उठवण्याची जुनी परंपरा आहे. मात्र त्या नादात शहरातील सार्वजनिक स्वच्छतेचे काम मार खाऊ लागले आहे. जलमंदिर समोरील पानवेली काढण्यासाठी वारंवार लोकप्रतिनिधींच्या कार्यकर्त्यांनी वेळोवेळी सूचना देऊनही हे काम अद्याप झालेले नाही. यामुळे प्रशासक अभिजीत बापट यांचा प्रशासनावर वचक नाही काय? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
वृक्ष विभागाचे कर्मचारी संपूर्ण आठ तासाच्या सेवेमध्ये वृक्ष तोडणीची जुजबी कामे करून तेथून गायब होत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यावर लक्ष ठेवणारी स्वतंत्र यंत्रणा नसल्यामुळे या कर्मचार्यांचे फावले आहे. या विभागाचे प्रमुख अभियंता सुधीर चव्हाण यांनी या प्रकाराला आळा घालून ठेकेदाराची हजेरी घ्यावी आणि त्याला कडक शब्दात समज द्यावी, अशी मागणी होत आहे.
पानवेलींच्या गर्दीत हरवले मोती तळे
वृक्ष विभागामधील ठेकेदाराच्या झोपा; कर्मचार्यांची टाळाटाळ
by Team Satara Today | published on : 05 September 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा