सातारा : सातारा, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या उत्तेश्वर (ता. महाबळेश्वर) मंदिराच्या जतन व संवर्धनाच्या कामाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. मंदिर संवर्धनाच्या आराखड्याला शासनाची मंजुरी मिळाली असून, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) कामासाठी कंत्राटदार नियुक्त करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यासाठी सुमारे ३७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे.
राज्य सरकारने राज्यातील नऊ प्राचीन मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी हाती घेतलेल्या महत्त्वाकांक्षी उपक्रमांत उत्तेश्वर मंदिराचा समावेश आहे. राज्यातील प्राचीन मंदिरे आणि लेण्या-शिल्पे यांच्या संवर्धनातून त्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. एमएसआरडीसीच्या पुढाकाराने उत्तेश्वर मंदिराच्या संवर्धनाच्या कामाला गती मिळणार आहे.
निविदेनुसार २४ महिन्यांमध्ये काम पूर्ण करावे लागणार आहे. पुढील सहा महिन्यांत वन विभागाची आवश्यक मंजुरी मिळविण्याची जबाबदारी कंत्राटदारावर सोपविण्यात आली आहे.
दरम्यान संवर्धनाच्या कामामध्ये सभामंडप, नगारखाना, मंदिराभोवती लग्नस्थान संरक्षण भिंत, मुख्य प्रवेशद्वारापासून नगारखान्यापर्यंतच्या दगडी पायऱ्यांची दुरुस्ती, लहान मंदिरे, पालखी कट्टा बांधणे, स्तंभ, नक्षीकाम तसेच इतर बांधकामांसह विद्युत कामांचा समावेश आहे. मंदिराचे मूळ स्थापत्य आणि ऐतिहासिक स्वरूप अबाधित ठेवून कामे करण्यात येणार आहेत. यामुळे परिसरातील धार्मिक तसेच वारसा पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे.
उत्तेश्वर मंदिराच्या जतन व संवर्धनाचे काम करत असताना जुन्या पद्धतीने चुना, गूळ, बेल फळाचा रस यांच्या मिश्रणातून केलेल्या पदार्थांचा वापर करण्यात येणार आहे. यासोबतच काळया बेसॉल्ट दगडाचा वापर केला जाणार आहे. मंदिराच्या मूळ बांधकामाला आणि स्थापत्यशैलीला साजेशा पद्धतीनेच कामे करण्यात येणार असून, संवर्धनाच्या कामात सिमेंटचा वापर टाळण्यात येणार आहे.
उत्तेश्वर मंदिर वन विभागाच्या जागेत आहे. या मंदिराच्या संवर्धनाच्या कामासाठी वन खात्याची परवानगी अद्याप मिळाली नसल्याची स्थिती आहे. मात्र परवानगी मिळवण्याचे काम अंतिम टप्प्यात असल्याचे एमएसआरडीसीतील एका अधिकाऱ्याने सांगितले.
प्राचीन मंदिरांना नवे वैभव..
राज्य सरकारकडून प्राचीन आणि ऐतिहासिक मंदिरांचे जतन व संवर्धन करून त्यांना पर्यटनाच्या दृष्टीने विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूरचे कोपेश्वर मंदिर, नाशिकमधील गोंदेश्वर मंदिर, अमरावतीतील आनंदेश्वर मंदिर, गडचिरोलीतील मार्कंडेश्वर मंदिर आणि कार्ला येथील एकवीरा देवी मंदिराचा समावेश आहे. या मंदिरांच्या संवर्धनातून ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा जतन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील उत्तेश्वर मंदिर संवर्धनाचा मार्ग मोकळा; ३७ कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध, वनविभागाची मंजुरी अंतिम टप्प्यात
by Team Satara Today | published on : 08 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा