मुंबई : अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा लाभ देण्यासंदर्भातील प्रस्तावांवर सध्या कार्यवाही सुरू असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. आमदार शशिकांत शिंदे यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ही माहिती विधान परिषदेत मांडली.
राज्यातील अंगणवाडी सेविका आणि कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या मासिक मानधनासह इतर प्रलंबित मागण्यांबाबत आमदार शशिकांत शिंदे, योगेश टिळेकर, चित्रा वाघ, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, ॲड. निरंजन डावखरे आणि विक्रम काळे यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले. अंगणवाडी ही ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू महिलांचा आणि लहान बालकांचा महत्वाचा आधार असून, या केंद्रांमध्ये कार्यरत असलेल्या सेविकांना मिळणारे मानधन खूपच कमी असून ते किमान वेतनापेक्षा कमी असल्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मे २०२५ मध्ये हे लक्षात आले की सुमारे दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च 2025 या महिन्याचे मानधन अद्याप त्यांच्या बँक खात्यात जमा झालेले नाही.
राज्यातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध मागण्यांच्या समर्थनार्थ एप्रिल 2025 मध्ये किंवा त्याच कालावधीत मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन केले होते. या वेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन व ग्रॅज्युइटीसंदर्भातील प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला दिली होती. या पार्श्वभूमीवर, अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन त्वरीत देणे, पेन्शन व ग्रॅज्युइटीच्या प्रस्तावांना मान्यता देणे तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडवून त्यांना किमान वेतनाचा लाभ मिळावा, यासाठी शासनाने कोणती पावले उचलली किंवा कोणती कार्यवाही सुरू केली आहे, याचा खुलासा करण्यात यावा, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे आणि इतर प्रश्नकर्त्यांनी विधान परिषदेत केली.
यास उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, एकात्मिक बालविकास सेवा ही केंद्र सरकारच्या मदतीने राबवली जाणारी योजना असून, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन देण्यासाठी केंद्र शासनाचा हिस्सा, राज्य सरकारचा हिस्सा आणि अतिरिक्त राज्य निधी या तीन स्रोतांमधून आर्थिक तरतूद केली जाते. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस निधी उपलब्ध होण्यासाठी थोडा वेळ लागतो, आणि निधी मिळताच मानधन वितरणाची प्रक्रिया सुरू केली जाते.
त्यानुसार, मार्च 2025 चे मानधन 25 एप्रिल 2025 रोजी तर एप्रिल महिन्याचे मानधन 6 मे 2025 रोजी वितरित करण्यात आले आहे. सध्या मागील सर्व महिन्यांचे मानधन देण्यात आले असून कोणतीही थकबाकी शिल्लक नाही. अंगणवाडी कर्मचाऱ्यांची नियुक्ती मानधनावर आधारित असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन दिले जात आहे. याशिवाय, अंगणवाडी सेविकांना पेन्शन आणि ग्रॅज्युइटीचा लाभ देण्याच्या प्रक्रियेवर काम सुरू असल्याची माहिती मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.