सातारा जिल्ह्यात २७ ऑक्टोबरला राष्ट्रीय जंतनाशक मोहीम; ६ लाख ३१ हजार बालकांना मिळणार डोस

by Team Satara Today | published on : 25 October 2026


सातारा : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेंतर्गत मंगळवार, २७ ऑक्टोबर रोजी सातारा जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ६ लाख ३१ हजार ६५६ मुला-मुलींना जंतनाशक औषध देण्यात येणार आहे. मुख्य दिवशी औषध न मिळू शकलेल्या बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी मॉप-अप दिन आयोजित करण्यात आला आहे.
जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागातील सर्व शासकीय, अनुदानित, खाजगी शाळा, आश्रमशाळा, अंगणवाड्या आणि कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांना वयानुसार 'अल्बेंडाझोल' ही गोळी दिली जाईल. हे औषध प्रशिक्षित शिक्षक, अंगणवाडी सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखाली दिले जाणार असून, शालाबाह्य मुला-मुलींना आशा स्वयंसेविकांच्या मदतीने अंगणवाडी केंद्रांवर आणले जाणार आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष तथा आरोग्य सभापती राजू भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य, महिला व बाल विकास आणि शिक्षण विभागाच्या समन्वयातून ही मोहीम राबवली जात आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव आणि जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी या मोहिमेचे प्रत्यक्ष संनियंत्रण करत आहेत.
या मोहिमेच्या पूर्वतयारीसाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय सुकाणू समितीची बैठक पार पडली. डॉ. अभिराज सूर्यवंशी यांनी मोहिमेच्या कृती आराखड्याचे सादरीकरण केल्यानंतर, जिल्ह्यातील एकही पात्र बालक औषधापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. शहरी झोपडपट्ट्या, ऊसतोड कामगारांच्या वस्त्या, वीटभट्ट्या आणि स्थलांतरित कुटुंबांतील मुलांसाठी पल्स पोलिओच्या धर्तीवर सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
मातीतून होणाऱ्या जंतांच्या प्रादुर्भावामुळे मुलांमध्ये रक्तक्षय व कुपोषणाची समस्या उद्भवून त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर परिणाम होतो. बालकांचे पोषणमान व आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने ही मोहीम अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. १ ते १९ वर्षे वयोगटातील सर्व बालकांना या मोहिमेचा लाभ मिळवून द्यावा, तसेच आजारी बालकांना पूर्ण बरे झाल्यानंतरच डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध द्यावे, असे आवाहन जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद व आरोग्य विभागाने केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बालकांच्या अश्लील व्हिडिओंच्या प्रसारणप्रकरणी कराडमधील युवकावर गुन्हा दाखल
पुढील बातमी
मेढा तहसील कार्यालयातील झेंडावंदन चौथऱ्याची तोडफोड झाल्याचा प्रकार समोर; प्रशासनाच्या देखरेखीबाबत नागरिकांमधून नाराजी

संबंधित बातम्या