सातारा : जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली पाटबंधारे मंडळाने केलेल्या मागणीनुसार कोयना धरणातून दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी ८ वाजता २ हजार ४९२ क्युसेक पाणी नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. यासाठी धरणाचे दोन वक्र दरवाजे एक फुटाने उघडण्यात येणार असून, पायथा विद्युतगृहातून सुरू असलेल्या १ हजार ५० क्युसेक विसर्गासह कोयना नदीपात्रात एकूण ३ हजार ५४२ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे.
जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने पाण्याची गरज लक्षात घेऊन सांगली पाटबंधारे मंडळाच्या अधिकाऱ्यांनी कोयना धरणातूनपाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यानुसार कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून, त्यातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यात धरणाचे दोन वक्र दरवाजे उघडून आणखी २ हजार ४९२ क्युसेक पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
धरणातून पाण्याचा विसर्ग वाढणार असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्रालगतच्या नागरिकांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात जाऊ नये, असे आवाहन सांगली पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. नदीकाठावरील ग्रामपंचायतींनी आणि संबंधित यंत्रणांनी परिस्थितीची नोंद घेऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी, तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन कोयना सिंचन विभागाने केले आहे.
कोयनेतून सांगली जिल्ह्यासाठी ३,५४२ क्युसेक पाणी सोडणार; कोयना सिंचन विभागाचा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
by Team Satara Today | published on : 06 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा