सातारा : पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवार 27 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. या जनता दरबाराला विभाग प्रमुखांनीच उपस्थित रहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिले.
पालकमंत्री देसाई यांच्या अध्यक्षतेखाली 27 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जनता दरबारा संदर्भात जिल्हाधिकारी पाटील यांनी पूर्वतयारीबाबत आढावा घेतला. या दूरदृष्य प्रणालीद्वारे झालेल्या बैठकीला अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
जनता दरबारात येणाऱ्या तक्रारी, निवेदने यांची नोंद करुन संकलन करावे, असे निर्देश देवून जिल्हाधिकारी पाटील म्हणाले, 27 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या जनता दरबारात मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित राहून आपले प्रश्न मांडणार आहेत. मांडण्यात येणारा प्रत्येक प्रश्न विभाग प्रमुखांनी एकून घ्यावा व त्यावर कार्यवाही करावी.
लोकशाही दिनाच्या धर्तीवर जनता दरबाराचे आयोजन करण्यात येणार आहे. विभाग प्रमुखांनी आपल्या सोबत एक संगणक व प्रिंटरची व्यवस्था करावी. पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित जनता दरबारामध्ये येणाऱ्या प्रत्येक तक्रारी व निवेदनावर कायद्यानुसार व नियमानुसार योग्य तो निर्णय तात्काळ घेऊन तो संबंधिताला कळवावा, अशाही सूचना जिल्हाधिकारी पाटील यांनी बैठकीत केल्या.