अतिवृष्टीमुळे बाधितांना 73 कोटी 54 लाखाची मदत जाहीर

‎मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील; नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा

by Team Satara Today | published on : 13 September 2025


सातारा,  दि.  १३ :  गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाचा फटका बसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्देशानुसार बाधित भागात सुरु केलेले पंचनाम्याचे काम अंतिम टप्यात असून शेतकऱ्यांना 73 कोटी 54 लाखांची तातडीने मदत देण्यात आली आहे. एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही. शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे, असे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले. ही मदत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) च्या निश्चित निकषांनुसार वितरित केली जाणार आहे.

‎‎मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी सांगितले की, अवकाळी पाऊस व अतिवृष्टी यामुळे जून ते ऑगस्ट, २०२५ या कालावधीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे सर्वेक्षण करुन त्वरीत पंचनामे करण्याचे निर्देश दिले होते. राज्यात झालेल्या अवकाळी पाऊस व अतिवृष्टीमुळे एकूण ८४,३५६ शेतकरी बाधित झाले असून, सुमारे ७३,०६८ हेक्टर शेतीचे क्षेत्र नुकसानग्रस्त झाले आहे. महसूल, कृषि विभागाच्या वतीने पंचनामेचे काम पूर्ण झाले असून प्राप्त झालेल्या अहवालानुसार नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर आणि छत्रपती संभाजीनगर विभागातील हिंगोली तसेच, पुणे विभागातील सोलापूर या जिल्ह्यांत शेतीपिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता ७३ कोटी ५४ लाख रूपये इतका निधी वितरीत करण्यास शासनाची मंजूरी दिली आहे. नागपूर विभागासाठी (नागपूर, वर्धा, चंद्रपूर) – 1356.59 लाख रुपये, छत्रपती संभाजीनगर विभागासाठी (हिंगोली) – 18.28 लाख रुपये, पुणे विभागासाठी (सोलापूर) – 5979.17 लाख रुपये मंजूर झाले आहेत.

‎‎शेतकऱ्यांना दिलासा मिळणार 

DBT पोर्टलव्दारे लाभार्थ्यांना थेट त्यांच्या बैंक खात्यात निधी वितरीत करण्यात येणार नाही. लाभार्थ्यांना मदत वाटपाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात यावा. या आदेशाव्दारे तसेच यापूर्वी वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशाव्दारे नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना दिलेला मदतीचा निधी बँकांनी कर्ज खात्यात अथवा अन्यथा वसुलीसाठी वळती करु नये याकरिता जिल्हाधिकारी यांनी सर्व बैंकांना आवश्यक त्या सूचना निर्गमित कराव्यात. या सर्व सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील. या मदतीमुळे नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्हा परिषदेच्या मनमानीमुळे सचिन काकडे यांचा मृत्यू?
पुढील बातमी
भाजप महिला मोर्चाकडून राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध

संबंधित बातम्या