महाबळेश्वर तालुक्यातील शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे होणार नियमित- ​तहसीलदार सचिन म्हस्के यांची माहिती; ३१ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 04 May 2026


​महाबळेश्वर : महाबळेश्वर तालुक्यातील शासकीय जमिनीवर १ जानेवारी २०११ पूर्वी झालेली निवासी अतिक्रमणे आता नियमानुकूल (Regularize) केली जाणार आहेत. या संदर्भात शासनाने घेतलेल्या निर्णयाची माहिती महाबळेश्वरचे तहसीलदार सचिन म्हस्के यांनी दिली. या निर्णयामुळे तालुक्यातील अनेक गरीब व गरजू कुटुंबांच्या हक्काच्या निवासाचा प्रश्न सुटणार असून, पात्र लाभार्थ्यांना ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.

महसूल व वन विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार, राज्यातील (मुंबई शहर व उपनगर वगळून) शासकीय जमिनीवरील १ जानेवारी २०११ रोजी किंवा त्यापूर्वीची निवासी अतिक्रमणे ठराविक अटी व शर्तींच्या अधीन राहून नियमित केली जाणार आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी अतिक्रमण हे स्वतःच्या निवासासाठी असणे अनिवार्य आहे.

​शुल्काचे स्वरूप आणि मर्यादा : ​५०० चौ. फुटांपर्यंत: हे क्षेत्र पूर्णपणे विनामूल्य नियमित केले जाईल. ​५०० ते १५०० चौ. फूट: ५०० चौ. फुटांवरील क्षेत्रासाठी प्रचलित बाजारमूल्याच्या ५० टक्के शुल्क आकारले जाईल.

​व्यावसायिक वापर : जागेचा काही भाग व्यावसायिक कारणासाठी वापरला जात असल्यास २५ टक्के अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.

​मर्यादा : १५०० चौ. फुटांपेक्षा जास्त असलेले अतिक्रमण नियमित केले जाणार नाही, वाढीव बांधकाम पाडून टाकण्यात येईल.

​आवश्यक कागदपत्रे व अटी: निवासी पुराव्यासाठी मतदार यादीतील नाव, वीज बिल, मालमत्ता कर पावती, उपग्रह छायाचित्र (Satellite Image) किंवा इतर अधिकृत शासकीय दस्तऐवज ग्राह्य धरले जातील. विशेष म्हणजे, एका कुटुंबाला संपूर्ण महाराष्ट्रात केवळ एकाच अतिक्रमणाचा लाभ घेता येईल.

​या जमिनींवरील अतिक्रमणे नियमित होणार नाहीत:नदीपात्र, नाले, सार्वजनिक रस्ते, वन जमीन, गायरान जमिनी, आणि धोकादायक क्षेत्रांमधील वैयक्तिक अतिक्रमणे या योजनेअंतर्गत नियमित केली जाणार नाहीत. मात्र, गायरान जमिनीवरील भूमिहीन शेतमजूर, अनुसूचित जाती व जमातीतील व्यक्तींना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळवून देण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत कार्यवाही केली जाईल.

​"पात्र लाभार्थ्यांनी ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत विहित नमुन्यात आपले अर्ज तहसीलदार कार्यालयात सादर करावेत. मुदतीत अर्ज करणाऱ्या नागरिकांना अर्जावर अंतिम निर्णय होईपर्यंत संरक्षण दिले जाईल. नागरिकांनी या संधीचा लाभ घेऊन आपले निवासस्थान अधिकृत करावे."

— सचिन म्हस्के, तहसीलदार, महाबळेश्वर


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
तीन राज्यातील भाजपच्या विजयाचा आमदार महेश शिंदे यांच्या उपस्थितीत कोरेगावात जल्लोष; ‘जय श्रीराम’च्या घोषणांनी परिसर दणाणला
पुढील बातमी
साताऱ्यात कडाक्याच्या उन्हामुळे 'समर डायरिया'चे संकट; बालकांच्या आरोग्याबाबत खबरदारी घेण्याचे आवाहन

संबंधित बातम्या