दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज, यात वचपा काढल्याचा दावा करणे चुकीचे; वरिष्ठांच्या संमतीनेच झाला अंतिम निर्णय

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बिनविरोध निवडीवर मंत्री मकरंद पाटील यांचे स्पष्टीकरण

by Team Satara Today | published on : 18 November 2026


सातारा : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडीवरून महायुतीमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री मकरंद पाटील यांनी पूर्णविराम दिला आहे. बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संचालक उदयसिंह पाटील उंडाळकर, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे माजी आमदार दीपक चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. "या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली. यात कोणाचा वचपा काढल्याचा दावा करणे चुकीचे आहे," असे स्पष्टीकरण मकरंद पाटील यांनी दिले आहे.
मंत्री मकरंद पाटील म्हणाले की, "सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात आणि बिनविरोध पार पडली आहे. पहिल्या दिवसापासून आम्ही आणि शिवसेना एकत्र होतो. राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या महायुतीच्या तिन्ही घटक पक्षांनी एकत्र येऊन ही निवडणूक पार पाडली, यामुळे जिल्ह्यात एक चांगला संदेश गेला आहे."
"शिवेंद्रराजे भोसले, रामराजे नाईक निंबाळकर, शंभूराज देसाई आणि नितीन काका यांच्यासह आम्ही महायुती म्हणून यापूर्वीच एकत्र बसलो होतो. स्थानिक पातळीवर चर्चा करून घेतलेला हा निर्णय शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला. या तिन्ही वरिष्ठ नेत्यांच्या संमतीने आणि मार्गदर्शनाखालीच ही निवडणूक पार पडली आहे."
मकरंद पाटील म्हणाले की, "उदयसिंह पाटील उंडाळकर यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी अजितदादा पवार यांनी त्यांना शब्द दिला होता. तोच शब्द पाळत आज या अध्यक्ष निवडीच्या निमित्ताने त्यांना पक्षाच्या माध्यमातून योग्य तो न्याय देण्यात आला आहे."


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढल्यामुळे जनजीवन गारठले; सातार्‍याचे तापमान १३.९ तर महाबळेश्‍वरचे तापमान १५.१ अंशापर्यंत घटले
पुढील बातमी
कराड तालुक्यातील मुंढे गावात ४० जणांना डेंगीसदृश्य आजाराची लागण; साथीचा फैलाव रोखण्याचे आव्हान

संबंधित बातम्या