मी नाराज नाही, पण फॉर्म भरला नाही याची नाराजी आहे ; खासदार उदयनराजे भोसले यांची मतदानानंतर टोलेबाजी

by Team Satara Today | published on : 02 December 2025


सातारा : नगरपालिका निवडणुकांच्या प्रचार प्रक्रियेत मी कोठेही नाही याबाबत माझी कोणतीही नाराजी नाही. ज्या सर्व राजकीय घडामोडी आहेत, त्या व्यवस्थितरित्या सुरू आहेत. मी याबाबत अजिबात नाराज नाही फक्त नगराध्यक्ष पदासाठी मी फॉर्म भरू शकलो नाही,  याबाबत मात्र मी नाराज आहे, अशी मिश्किल टोलेबाजी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

येथील अनंत इंग्लिश स्कूलमध्ये नगरपालिका निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा हक्क उदयनराजे यांनी त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांच्यासह बजावला त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. 

ते पुढे म्हणाले,  भारतीय जनता पार्टीने सातारा शहरात आणि जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने सर्व उमेदवारांसाठी वातावरण निर्मिती करून विकासाचा अजेंडा लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले आहे. जिल्ह्यात आणि शहरात सर्वत्र विकासाची कामे बघून लोक निश्चित भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजयी करतील असा माझा विश्वास आहे. स्वतःच्या सक्रिय प्रचारातील अनुपस्थिती बाबत बोलताना उदयनराजे म्हणाले, प्रचार प्रक्रियेतील सर्व गोष्टी या आमचे बंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याशी चर्चा करूनच झालेल्या आहेत. आता आम्ही आघाडी म्हणून नाही तर भारतीय जनता पार्टी पक्ष म्हणून उमेदवारांच्या संदर्भाने एकत्र असून सातारकर पहिल्यांदाच पक्ष निवडणूक पाहत आहेत. मी अजिबात नाराज नाही मात्र नगराध्यक्षापदाचा फॉर्म मलाच भरायचा होता मलाच नागराध्यक्ष व्हायचे होते मात्र वेळेअभावी मी ते करू शकलो नाही, अशी मिश्किली उदयनराजे यांनी केली .

सातारा शहरातील बंडखोर उमेदवारांच्या संदर्भाने बोलताना उदयनराजे म्हणाले,  जागा मर्यादित होत्या मात्र लढणारे इच्छुक फार होते. त्यांची सांगड घालणे अत्यंत अवघड काम होते.अपक्षांना सुद्धा आम्ही सबुरीचा सल्ला दिला होता मात्र ज्यांनी माघार घेतली ते कौतुकास पात्र आहेत.  पण काही राजकीय महत्त्वाकांक्षी लोकांनी बंडखोरी केली.  लोकशाहीमध्ये प्रत्येकाला लढण्याचा अधिकार आहे. भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार हे निश्चित चांगल्या मतांनी विजयी होतील,  असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ड्राय डे नावाला, पार्सल मिळतंय भावाला
पुढील बातमी
विरोधक जर आले तर पालिकेत पत्रकारांना टोल द्यावा लागेल; सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांचा नरेंद्र पाटील यांना टोला

संबंधित बातम्या