रिक्षा चालकांनो सावधान; नियम मोडाल तर कारवाई अटळ!

आज सातारा शहरातील 12 रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

by Team Satara Today | published on : 21 August 2025


सातारा : गणवेश, अवैध प्रवासी वाहतूक व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या रिक्षाचालकांची वाहतूक पोलीस व प्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांनी तपासणी केली. यामध्ये बारा रिक्षाचालकांवर सातारा शहर वाहतूक शाखेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाने संयुक्त मोहीम राबवून बुधवारी शहरात रिक्षाचालकांची तपासणी सुरू केली. मद्यप्राशन करून कोणी रिक्षा चालवताहेत का, याचीही ब्रिथ ऍनलाझर मशीनने तपासणी करण्यात आली. यामध्ये प्रत्येक रिक्षा चालकाचा गणवेश, रिक्षाची कागदपत्रे, परवाना, फिटनेस प्रमाणपत्र तपासण्यात आले. शहरातील राजवाडा, गोलबाग, राधिका चौक, मोळाचा ओढा, बसस्थानक, पोवईनाका आदी ठिकाणी सातारा शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी तब्बल 80 रिक्षांची तपासणी केली. यामध्ये गणवेश न परिधान केलेले, पासिंग नसलेले व फिटनेस प्रमाणपत्र नसलेल्या 12 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली. काल दि. 20 रोजी 18 रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली होती.

रिक्षा चालकांना गणवेश अनिवार्य केलेला असताना काही रिक्षा चालक हे त्याचे उल्लंघन करताना आढळून येत आहेत. त्या अनुषंगाने अशा रिक्षा चालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे रिक्षा चालकांनी गणवेश परिधान करुनच रिक्षा चालवावी, असे आवाहन वाहतूक शाखेचे सपोनि अभिजीत यादव यांनी केले आहे.

या कारवाईमध्ये सातारा शहर वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक अभिजित यादव, पोलीस उपनिरीक्षक एस. डी. जाधव, पिसाळ, हवालदार योगेश जाधव, चंद्रकांत टकले, विजय साळुंखे, मनोहर वाघमले, सचिन नवघणे, नावडकर आदींनी भाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शाहूपुरीत पुलाच्या कामाकरता रस्ता, पाणी पुरवठा दोन दिवस बंद
पुढील बातमी
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा

संबंधित बातम्या