सातारा : सातारा–महाबळेश्वर मार्गावरील केळघर घाटात भीषण अपघात झाला असून चालकाचा ताबा सुटल्याने एक मालवाहू ट्रक संरक्षक कठडा तोडून रस्त्यालगतच्या खोल नाल्यात कोसळला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू ट्रक क्रमांक KA 28 C 5568 हा रोहा येथून साताऱ्याच्या दिशेने जात होता. केळघर घाटातील मुकवली माची येथील एका धोकादायक वळणावर गुरुवारी पहाटे सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास ट्रकवरील चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक थेट रस्त्याशेजारील संरक्षक कठडा तोडून खाली नाल्यात कोसळला.
या भीषण अपघातात ट्रक चालक अजिनाथ नागरगोजे (वय अंदाजे ३२, रा. यवनवाडी, जि. बीड) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सहा. पो. नि. अश्विनी पाटील यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि रेस्क्यू टीमच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस व बचाव पथकाने क्रेनच्या साहाय्याने मोठ्या कष्टाने ट्रकमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले; मात्र तपासणीअंती त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता.
केळघर घाटातील धोकादायक वळणांमुळे यापूर्वीही अनेक अपघात झाले असून, या मार्गावर अधिक प्रभावी सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी वाहनचालकांकडून होत आहे.