खुनासह पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 05 June 2025


सातारा : खून करुन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुईंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनवडी (ता. वाई) येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या लालासो बाबुराव शिंदे यांच्या विहिरीत दि. 2 रोजी 25 ते 30 वर्षे वयाच्या तरुणाचा मृतदेह आढळून आला. मृत तरुणाच्या अंगात फक्त जीन्स पँट असून एका मोठ्या पोत्यात दगड टाकून मृतदेह व मृतदेह असलेले ते पोते तारेने बांधून विहिरीमध्ये टाकल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधिताचा कशानेतरी गळा आवळून व डोक्यात मारुन खून केल्याचे दिसून आले आहे.

विहिरीत सापडलेल्या या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वाई पोलीस उपअधीक्षकांसह भुईंज पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. मृतदेहाच्या हातावरील टॅटूसह घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमुळे खुनाचा संशय व्यक्त होत आहे.

घटनास्थळी भुईंज पोलीस आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पथक, फॉरेन्सिक पथक यांच्यासह वाईचे पोलीस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम, भुईंजचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पतंग पाटील, सूरज शिंदे हे रात्री उशिरापर्यंत ओळख पटवण्यासाठी तपास करत होते.

भुईंज पोलिसांची तपास पथके परप्रांतीय कामगार, हॉटेल वेटर, अन्य कामातील तरुण कामगार व टॅटूच्या आधारे माहिती घेत आहेत. मंगळवारी रात्री भुईंज पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भाजपच्या पदाधिकार्‍यांचे रस्त्यावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन
पुढील बातमी
संशयास्पद मालमत्ता जवळ बाळगल्या प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या