सातारा : महाबळेश्वर आगारातील वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याने पत्रकारांबाबत उर्मट व अयोग्य भाषा वापरल्यानंतर सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ व डिजीटल मिडीया परिषदेच्यावतीने तीव्र निषेध नोंदवला. संबंधित अधिकार्याला निलंबित करण्याची दणकेबाज मागणी सातार्यात पत्रकारांनी केल्यानंतर अधिकार्याला तसे वक्तव्य भोवले असून तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली.
यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर भोईटे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, सचिव गजानन चेणगे, खजिनदार अमित वाघमारे, संघटनेचे पदाधिकारी चंद्रकांत देवरुखकर, अमोल निकम, कैलास मायणे, प्रवीण शिंगटे, विशाल कदम, सिध्दार्थ लाटकर, निनाद बाजारे तसेच पत्रकार उपस्थित होते.
रविवारी महाबळेश्वर येथे पर्यटकांची मोठी गर्दी झाल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी महाबळेश्वर आगाराने नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास अगोदर बस सोडण्याची व्यवस्था केली होती. मात्र बसमध्ये प्रवासी भरल्यानंतरही बस न हलवल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. पुढील प्रवासासाठी बस व रेल्वे गाठण्याची घाई असल्याने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांमध्ये वाद निर्माण झाला. त्यावेळी तेथे उपस्थित असलेले अधिकारी शाहरुख खान यांच्या बोलण्याचा सूर पाहून तेथे उपस्थित पत्रकारांनी व्हिडिओ चित्रीकरण सुरू केले.
त्यानंतर संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांशी उर्मट व अयोग्य भाषेचा वापर केला. संबंधित पत्रकारांनी ही बाब सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांना सांगितल्यानंतर त्यांनी सातारा पत्रकार संघ व डिजीटल मीडीया परिषद, महाबळेश्वर पत्रकार संघाला सूचना केल्या. त्यानुसार महाबळेश्वरात पत्रकारांनी संबंधित निरीक्षकाला धारेवर धरले तर सातार्यात विभाग नियंत्रक ज्योती गायकवाड यांना निवेदन देण्यात आले. पत्रकारांनी निवेदन देत संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करावे व कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली. यावेळी पत्रकारांनी सर्व बाजू, व्हिडीओ त्यांना दाखवले. कठोर कारवाई न झाल्यास जिल्हाभर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला. पत्रकारांची बाजू ऐकून विभाग नियंत्रक यांनी संबंधित वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याचे निलंबन केले.
महाबळेश्वरसारख्या घटना सातारा जिल्हा पत्रकार संघ खपवून घेणार नाही. कोणत्याही अधिकृत पत्रकाराला कोणत्याही प्रवृत्तींकडून त्रास झाला तर संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील. सातारा, महाबळेश्वर येथे सहकार्यांनी आंदोलन केल्याने परिवहन विभागाने संबंधित उर्मट अधिकार्याला निलंबित केले आहे. ही कारवाई समस्त सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेच्या एकजुटीचा विजय आहे.
-हरीश पाटणे, अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ
महाबळेश्वर येथे पत्रकारांबाबत आक्षेपार्ह शब्दाबाबत मी दिलगिरी व्यक्त करते. तेथे झालेला सर्व प्रकार चुकीचा आहे. संबंधित अधिकाऱ्यावर आम्ही निलंबनाची कारवाई करत आहोत.
-ज्योती गायकवाड, विभाग नियंत्रक