पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पुसेगाव येथील श्री सेवागिरी महाराजांचा यंदाचा रथोत्सव सोहळा येत्या १८ डिसेंबरला होणार आहे. श्री सेवागिरी महाराज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त ७८ वे यात्रा प्रदर्शन १४ ते २४ डिसेंबरदरम्यान मोठ्या दिमाखात भरवण्यात येणार आहे. ग्रामीण संस्कृती व शहरी नाविन्यतेचा बाज असलेल्या यंदाच्या यात्रेचे स्वरुप व्यापक व शानदार करण्यात आले आहे, अशी माहिती देवस्थानचे मठाधिपती १०८ श्रीमहंत सुंदरगिरी महाराज व ट्रस्टचे चेअरमन संतोप वाघ यांनी दिली.
श्री सेवागिरी महाराज मंदिरात यात्रा प्रदर्शन जाहिरात व श्री सेवागिरी दिनदर्शिका प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी विश्वस्त डॉ. सुरेश जाधव, रणधीर जाधव, बाळासाहेब जाधव, सचिन देशमुख, गौरव जाधव, सचिव विशाल माने, ट्रस्टचे माजी पदाधिकारी उपस्थित होते. देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सेवागिरी महाराजांच्या यात्रेनिमित्त ११ दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. दि. १४ डिसेंबरला मानाच्या झेंडा मिरवणुकीने यात्रेस प्रारंभ होईल. १० ते १२ डिसेंबरदरम्यान भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. १४ व १५ डिसेंबरला गावातील श्री हनुमानगिरी
हायस्कूलच्या मैदानावर अखिल भारतीय दिवसरात्र शुटींग व्हॉलिबॉल स्पर्धा होतील. १६ डिसेंबरला श्री सेवागिरी हिंदकेसरी बैलगाड्यांच्या जंगी शर्यतीचे आयोजन केले आहे. १७डिसेंबरला प. पू. नारायणगिरी महाराज यांच्या ७२ व्या पुण्यतिथीनिमित्त
निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले आहे. या आखाड्यात ५१ रुपयांपासून १ लाख ५१ हजार रुपयांपर्यंतच्या कुस्त्या होतील. १८ डिसेंबरला यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची फुलांनी व नोटांच्या माळांनी सजवलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढली जाईल. १७ ते २१ डिसेंबरदरम्यान 'श्री सेवागिरी राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन' भरवण्यात येईल. दि. २० डिसेंबरला सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत श्री सेवागिरी खुला युवा महोत्सवाचे आयोजन केले आहे. २० व २१ डिसेंबरला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा होईल. २१ डिसेंबरला पहाटे ६ वाजता श्री सेवागिरी मॅरेथॉन स्पर्धा होईल. २२ डिसेंबरला भव्य बँड महोत्सव होईल. २२ डिसेंबरला सकाळी ११ वाजता भव्य श्वान शर्यत होईल. २२ डिसेंबरला बक्षीस जनावरांची नोंद केली जाईल. २३ डिसेंबरला बक्षीसप्राप्त जनावरांची निवड तर २४ डिसेंबरला बक्षीस वितरण समारंभहोणार आहे.