दोन मोटारसायकल चोर जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १३ दुचाकी जप्त, १२ गुन्हे उघड

by Team Satara Today | published on : 30 April 2026


सातारा : स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) सातारा यांनी उल्लेखनीय कारवाई करत दोन मोटारसायकल चोरांना ताब्यात घेत १२ चोरीचे गुन्हे उघडकीस आणले असून, त्यांच्या ताब्यातून एकूण २ लाख १५ हजार रुपये किमतीच्या १३ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यामध्ये एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.

ओंकार भाऊसो माने (वय 20 रा. वडूज, ता. खटाव) व अन्य एका विधी संघर्षित बालकाची कसून चौकशी करण्यात आली. त्यावेळी दुचाकी चोरीचे हे षडयंत्र उघडकीस आले. पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी वाहन चोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष पथक स्थापन केले होते. सहायक पोलीस निरीक्षक रोहित फार्णे यांच्या नेतृत्वाखालील या पथकाला वाहन चोरट्यांची माहिती काढून कारवाईचे आदेश देण्यात आले होते.

२९ एप्रिल रोजी एलसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे एमआयडीसी कार्यालयाजवळील बसस्टॉप परिसरात सापळा रचण्यात आला. येथे नंबरप्लेट नसलेली संशयित मोटारसायकल घेऊन आलेल्या दोन इसमांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी मार्च २०२५ मध्ये कराड येथील कॉटेज हॉस्पिटल परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.

पुढील सखोल तपासात या दोघांनी कराड, वडूज व औंध परिसरात आणखी १२ मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून एकूण १३ दुचाकी जप्त करत १२ गुन्ह्यांचा उलगडा केला आहे. या प्रकरणी कराड शहर, वडूज व औंध पोलीस ठाण्यात दाखल विविध गुन्ह्यांचा तपास उघडकीस आला असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये कारवाई करण्यात आली आहे.



या कारवाईत पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, रोहित फार्णे, तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. त्यांच्या या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस अधीक्षक निखील पिंगळे व अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील ८ पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर
पुढील बातमी
काँग्रेस कमिटी परिसरातील अनधिकृत बांधकामांवर हातोडा; सहा ते सात टपऱ्या हटवल्या

संबंधित बातम्या