सातारा : केंद्र शासनाने सोयाबीन खरेदीचा हमीभाव ठरवून दिलेला असताना सातारा जिल्ह्यात सोयाबीनचा तेवढा दर मिळत नाही. परिणामी शेतकर्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. हमीभाव नियमन आणि नियंत्रण याकरिता सातार्यात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरू करण्यात यावे, अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे युवक जिल्हाध्यक्ष प्रकाश उर्फ सोनू साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे केली आहे.
जिल्हा उपनिबंधकांना सादर केलेल्या निवेदनात नमूद आहे की, सध्या शेतकर्यांचा सोयाबीन काढणीचा हंगाम सुरु झाला असून सोयाबीनला 4300 रुपये प्रति क्विंटल बाजार भाव मिळत आहे. यातून शेतकर्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. केंद्र शासनाने सोयाबीनचा हमीभाव 4892 एवढा ठरवून दिलेला आहे. तरी सुद्धा बाजारात व्यापार्यांकडून होणारी सोयाबीनची खरेदी ही 4300 रुपये प्रति क्विंटलने सुरु आहे. यातून शेतकर्यांना मोठ्या नुकसानीस सामोरे जावे लागत आहे. सोयाबीन पिकासाठी होणार्या खर्चात प्रत्येक वर्षी वाढ होत आहे. परंतु सोयाबीनचे दर मात्र घसरत आहेत. यामध्ये केंद्र सरकार असो वा राज्यसरकार असो; दोन्हींकडून यामध्ये शेतकर्यांना कोणत्याही प्रकारची दिलासादायक गोष्ट घडताना दिसत नाही. या उलट निसर्गाच्या प्रकोपाने शेतकर्यांच्या अडचणीत वाढ होत आहे.
यासाठी सातारा जिल्ह्यातील प्रत्येक बाजार समिती व उपबाजारात सोयाबीन हमीभाव केंद्र सुरु व्हावे, ही आमची मागणी आहे. यासाठी शासन स्तरावर जास्तीत जास्त शर्थीचे प्रयत्न करून सोयाबीन हमीभाव खरेदी केंद्र लवकरात लवकरच सुरु व्हावीत, अशी मागणी निवेदनात नमूद आहे.