कराड : ढेबेवाडी आणि परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर कमालीचा वाढला असून, मानवी वस्तीत घुसून बिबट्याचे हल्ले वाढले आहेत, ढेबेवाडी या रहदारीच्या बाजारपेठ असणार्या गावात दोन दिवसापूर्वी मध्यरात्री 12 च्या सुमारास ढेबेवाडी पोलीस स्टेशनपासून काही अंतरावर असलेल्या बीएसएनएल कार्यालयाजवळ बिबट्याने एका पाळीव कुत्र्यावर झडप घालून त्याला फरफटत नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बिबट्याच्या हल्ल्याचा अंगावर काटा आणणारा संपूर्ण थरार स्थानिक रहिवासी शंकर चौधरी यांनी आपल्या मोबाईल कॅमेर्यात कैद केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वार्यासारखा व्हायरल होत आहे. ढेबेवाडीच्या पश्चिम दिशेला घनदाट जंगल आणि मोठी झाडी असल्यामुळे या भागात वन्यजीवांचा वावर तसा नवा नाही. यापूर्वी ढेबेवाडीच्या शेजारी असणार्या परिसरातील ग्रामीण भागात बिबट्याने अनेकदा पाळीव प्राण्यांवर हल्ले करून त्यांना फस्त केले आहे.
दोन दिवसापूर्वी मध्यरात्रीच्या शांततेत अचानक कुत्र्याच्या भुंकण्याचा आणि ओरडण्याचा मोठा आवाज आल्याने स्थानिक नागरिक शंकर चौधरी यांनी खिडकीतून बाहेर पाहिले. समोर साक्षात बिबट्या उभा असलेला पाहून त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र, त्यांनी दाखवलेल्या धाडसामुळे बिबट्याची ही थरारक हालचाल आणि कुत्र्याची शिकार केल्याचा प्रकार मोबाईल कॅमेर्यात टिपला गेला. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर संपूर्ण ढेबेवाडीत बिबट्याच्या दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.