राज्य कर्तव्य मेळाव्यात साताऱ्याच्या ‘आझाद’ची सुवर्ण भरारी; तीन पदकांसह ‘बेस्ट डॉग’चा बहुमान

by Team Satara Today | published on : 12 October 2026


सातारा : पुणे येथे पार पडलेल्या २१ व्या राज्यस्तरीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात सातारा जिल्हा पोलीस दलाच्या ‘आझाद’ या श्वानाने तीन सुवर्णपदकांसह ‘बेस्ट डॉग ऑफ कॉम्पिटिशन’ हा सर्वोच्च किताब पटकावत राज्यात अव्वल क्रमांक मिळवला आहे.
पुणे येथे ४ ते १० ऑक्टोबरदरम्यान आयोजित या मेळाव्यात राज्यातील २४ संघांमधील तब्बल ४७ श्वानांनी सहभाग नोंदवला होता. यात सातारा पोलिसांच्या बॉम्ब शोधक व नाशक पथकातील (बीडीडीएस) लॅब्राडॉर जातीच्या आझादने स्फोटक शोधण्याच्या कौशल्यात ४०० पैकी ३५५ गुणांची कमाई करत सुवर्णपदकाला गवसणी घातली. यासह आज्ञाधारकपणा आणि अन्न नकार या अत्यंत चुरशीच्या प्रकारांतही त्याने निर्विवाद वर्चस्व गाजवत आणखी दोन सुवर्णपदके नावावर केली. यंदापासून नव्याने सुरू करण्यात आलेला ‘बेस्ट डॉग ऑफ कॉम्पिटिशन’ हा प्रतिष्ठेचा चषकही आझादने पटकावत सर्वोत्कृष्ट कामगिरीची नोंद केली.
या ऐतिहासिक यशामुळे मुंबई येथे रंगणाऱ्या ७० व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळाव्यासाठी आझादची निवड झाली आहे. यापूर्वी साताऱ्याच्या ‘सूर्या’ आणि ‘सूचक’ या श्वानांनी राष्ट्रीय पातळीवर सुवर्ण कामगिरी नोंदवली होती. त्यामुळे आता राष्ट्रीय स्तरावर सलग तिसऱ्या वर्षी सुवर्ण परंपरेची हॅटट्रिक साधण्याचे आव्हान आझादसमोर आहे. आझादच्या या यशात त्याचे हँडलर पोलीस हवालदार रूपेश साळुंखे आणि पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण आहिरे यांच्या कठोर परिश्रमांचा मोठा वाटा असून, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह बीडीडीएस पथक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळे ही सुवर्ण कामगिरी शक्य झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोमेश्वर कारखाना निवडणूक; राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, दिवंगत अजितदादा पवार यांना विजय समर्पित

संबंधित बातम्या