सातारा : खटाव पंचायत समितीमधील वर्ग 3 चा विस्तार अधिकारी लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, यातील तक्रारदारांच्या पत्नीच्या नावे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) मधून सन 2024-25 या कालावधीमधील पुसेसावळी येथे घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलाचा हप्ता खटाव पंचायत समिती मधील विस्तार अधिकारी सांख्यिकी शरण देवीसिंग पावरा मूळ रा. अंबापुर, ता. शहादा, जि. नंदुरबार. सध्या रा. शिवाजीनगर, दहिवडी, ता. माण, जि. सातारा यांनी 70 हजार रुपये मंजूर करून दिला म्हणून, तसेच यानंतरचे देखील घरकुलाचे हप्ते मंजूर करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता पाच हजार रुपये आणि उर्वरित पाच हजार रुपये पुढील आठवड्यात देण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे आज दि. 21 रोजी लाचेच्या रकमेतील पहिला हप्ता पाच हजार रुपये खटाव पंचायत समितीतच स्वीकारताना पावरा यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या कारवाईत पुणे परिक्षेत्राचे लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक विजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सचिन राऊत, गणेश ताटे, सत्यम थोरात, अजयराज देशमुख यांनी सहभाग घेतला. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन राऊत करीत आहेत.