सातारा : ग्रामीण भागातून सातारा शहरात येण्यासाठी महत्वाचे ठिकाण असलेले वाढे फाटा परिसरात बुधवारी वेण्णा पूल परिसरात खड्ड्यांवर पॅचींगच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. कामाच्या शुभारंभालाच वाहनांच्या रांगा लागल्या. वाढे फाटा ते पाटखळमाथा या दरम्यान सुमारे 2 किमीवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, संतप्त नागरिक व वाहतूक पोलिसांनी वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर डांबरीकरणाचे काम थांबवले तसेच रात्रीच्यावेळी व अगाऊ सूचना देवून काम करण्याची विनंती संबंधित ठेकेदाराला केली.
वाढेफाटा हे सातारा, कोरेगाव, फलटण, खंडाळा तालुक्यांसाठी सातारा शहरात येण्यासाठीचे प्रवेशद्वार आहे. सातारा-लोणंद मार्गावर वाहनांची सतत वर्दळ राहते. सध्या शाळांना सुट्ट्या असल्या तरी शिष्यवृत्ती, दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे ज्यादा तास सुरु आहेत. सातारा-लोणंद रस्त्यावरील लोणंद तसेच शिवथर, लिंब, पाटखळमाथ्याकडून येणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळवून मगच हे पॅचिंगचे काम करावे, अशी मागणी वाढे व परिसरातील नागरिकांमधून होत आहे. वाढेफाटा ते वाढे ऑईलमिलपर्यंत सुमारे 2 किमी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कामाच्या वेळेत भर उन्हात तिष्ठत थांबावे लागल्याने वाहनधारकांमधून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. वाढे ते राष्ट्रीय महामार्गादरम्यानच्या वेण्णा पुलाच्या डांबरीकरणाआधी सातारा-लोणंद मार्गावरील पाटखळमाथ्यापर्यंतची वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी, अशी, मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.