महामार्गावर पाचवड फाटा येथे भरधाव एसटीची चाके निखळली, सुदैवाने जीवितहानी टळली; वाहतूक झाली होती ठप्प

by Team Satara Today | published on : 18 May 2026


कराड  : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा येथे रविवार असल्याने वाहने सुसाट धावत होती. अशात सकाळी अकराच्या सुमारास अनर्थ घडला अन् भरधाव एसटीची पाठीमागील चाके अचानक निखळल्यामुळे महामार्गावरच चाकाची भिंगरी झाली अन् एसटी खाली बसली. या अपघातात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अपघातानंतर महामार्गाच्या सातारा-कोल्हापूर लेनवरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर पाचवड फाटा येथे पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे येथील भराव पुलावरून एकाच लेनवरून वाहतूक सुरू आहे. ईश्वरपूर आगाराची कराड-सांगली एसटी (एमएच ०६ एस ८३४५) ही सकाळी साडेदहाच्या सुमारास कराडमधून सांगलीकडे जात होती.

ही एसटी पाचवड फाटा येथे पुलावर आल्यानंतर अचानक एसटीची पाठीमागील चाके निखळल्याने एसटी पुलावरच थांबली. त्यामुळे पाठीमागून येणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. या घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र महामार्गावरील एकच लेन सुरू असल्याने सातारा-कोल्हापूर बाजूची वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे वाहनांच्या रांगा कराड बाजूकडे नांदलापूरपर्यंत लागल्या होत्या.

महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे समजताच पोलिस उपनिरीक्षक संतोष जगदाळे, पोलिस कर्मचारी विष्णू मर्ढेकर, आशिष पाटील यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी ठेकेदार कंपनीच्या ग्रेडर मशीनच्या सहाय्याने महामार्गावर चाके निखळलेली एसटी सुमारे अडीचशे मीटर ढकलून बाजूला केली. त्यानंतर तासाभराने महामार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र महामार्गावर झालेल्या वाहतूक कोंडीचा वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नीट पेपरफुटी : शिवराज मोटेगावकर यांना नऊ दिवसाची सीबीआय कोठडी; टोळीशी संगनमत करून पेपर फुटी आणि प्रसार केल्याचे प्राथमिक तपासात समोर

संबंधित बातम्या