सातारा : “आजचे युग हे विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे आहे. विद्यार्थ्यांनी फक्त अभ्यासापुरते न थांबता विकसित होणाऱ्या नवनवीन तंत्रज्ञानाचा अभ्यास करावा. रयत सायन्स सेंटरमुळे विज्ञानाचे विविध पैलू हसत खेळत शिका, समजून घ्या. स्वतः नवनवीन प्रयोग करा, सतत विज्ञानाशी जोडलेले रहा,” असा मौलिक सल्ला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांनी दिला.
रयत शिक्षण संस्थेच्या सायन्स सेंटरला पाहण्यासाठी न्यू इंग्लिश स्कूल, पवारवाडी (जावली) आणि त्रिंबकराव काळे विद्यालय, मलवडी (माण) येथील विद्यार्थी मोठ्या उत्साहाने आले होते. या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोग, तंत्रज्ञानाचे नवे आयाम आणि वैज्ञानिक विचार करण्याची संधी मिळणार आहे. त्यांना यावेळी संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी आणि सचिव विकास देशमुख यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानाच्या अभ्यासाबरोबर जिज्ञासा, संशोधन वृत्ती आणि प्रयोगशीलता अंगीकारण्याचे प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
सचिव विकास देशमुख यांनी "विद्यार्थ्यांनी विज्ञानाकडे आकर्षित व्हावे, विज्ञानाचा अभ्यास करताना आनंद लुटावा आणि प्रयोगशीलतेतून देशाच्या विकासात तुम्ही सर्वोत्तम योगदान देणार आहात," असा विश्वास देत उत्साह वाढवला.
यावेळी पवारवाडी विनोद बलखंडे, मलवडीचे श्रीमंत भोसले हे उपस्थित होते.