सातारा : सातारा जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन खा. नितीन पाटील यांची महाराष्ट्रात राज्यसभा सदस्यपदी निवड झाल्यानंतर, त्यांचा आज दिल्ली येथील संसद भवनात शपथविधी झाला. उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी नितीन पाटील यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
महायुतीतून राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षातर्फे सातारा जिल्हा बँकेचे चेअरमन, आ. मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना राज्यसभेवर संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकसभा प्रचारावेळी नितीन पाटील यांना खासदार करण्याचा शब्द दिला होता. तो शब्द अजित पवार यांनी पाळला. भाजपचे खा. पियूष गोयल यांच्या रिक्त पदावर नितीन पाटील यांनी संधी देण्यात आली आहे. राज्यसभा निवडणुकीची प्रक्रिया 3 सप्टेंबरला पूर्ण झाली. त्यानंतर आज नवनियुक्त खासदारांचा शपथविधी झाला. हा कार्यक्रम उपराष्ट्रपती धनखड यांच्या दालनात झाला. यावेळी नितीन पाटील यांनी मराठी भाषेतून शपथ घेतली.
सातार्यासह महाराष्ट्रातील जनतेच्या हिताच्या कामासाठी प्राधान्य देणार आहे. राज्यसभेवर संधी दिल्याबद्दल राष्ट्रवादीचे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच राष्ट्रवादीसह महायुतीतील नेत्यांचे आभारी आहे. राज्यसभेच्या माध्यमातून देशाच्या सेवेसाठी सदैव, पूर्ण क्षमतेने कार्यरत राहणार आहे.
- खा. नितीन पाटील.