सातारा : प्रकाशाचा सण असणाऱ्या दिवाळीला खऱ्या अर्थाने नरक चतुर्दशीच्या निमित्ताने सुरुवात होणार आहे .नवे कपडे फटाक्यांची आतिषबाजी आणि प्रकाश परवाचे दणक्यात स्वागत यासाठी सातारकर आणि जिल्ह्यातील तमाम नागरिक सज्ज झाले असून प्रकाशाचे हे जल्लोष पर्व पुढे चार दिवस सुरू राहणार आहे.
बाजारपेठेमध्ये चैतन्याचे वातावरण असून राजपथाला दिवाळीच्या पूर्वसंध्येला हॅप्पी स्ट्रीटचे स्वरूप आले होते. सातारकरांनी खरेदीसाठी मोती चौक ते पंचमुखी गणेश यादरम्यान प्रचंड गर्दी केली होती. नरक चतुर्दशीच्या पहिल्या अभ्यंग स्नानासाठी सातारकरांनी जोरदार तयारी केली आहे. अभ्यंग स्नानासाठी उठणे, तेल तसेच पूजेचे साहित्य यासाठी खरेदी केल्यानंतर सातारकर पहिल्या दिवाळी सणासाठी आतुरतेने वाट पाहत आहेत.
यंदाची दिवाळी ऑक्टोबर महिन्यातच शेवटच्या टप्प्यात आली असून सोमवारी नरक चतुर्दशीचा शुभ मुहूर्त पहाटे साडेपाच वाजल्यापासून सुरू होत आहे. मंगळवार दि. 21 रोजी लक्ष्मी कुबेर पूजन बुधवार दि. 22 रोजी रोजमेळ पूजन बलिप्रतिपदा तसेच दिवाळी पाडवा आणि गुरुवारी 23 ऑक्टोबर रोजी भाऊबीज सलग तीन दिवस हे जल्लोष पर्व सुरू राहणार आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर लगेचच जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेऊन नेतेमंडळींनी सुद्धा दिवाळी सणाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी चालू केले आहेत.सातारा मध्यवर्ती एसटी आगारातर्फे सोमवारी वाहक आणि चालक यांच्या अभ्यंगस्नानाचे नियोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्हा पोलिसांनी सुद्धा कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने ठोस पावले उचलले असून सातारा शहरांमध्ये येणाऱ्या एन्ट्री पॉईंट वर 54 पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे.
सोमवारची नरक चतुर्दशी आणि मंगळवारची अश्विन अमावस्या यामुळे सराफ बाजार सज्ज झाला असून सोन्याचा भाव सव्वा लाख रुपये तोळ्यावर पोहोचला आहे. तरीसुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या दागिन्यांच्या खरेदीसाठी साताऱ्याच्या बाजारपेठेमध्ये गर्दी होत आहे .दिवाळी म्हणल्यावर फराळ आलाच रेडिमेड फराळाचा उलाढालीचा आकडा तब्बल दीड कोटी वर पोहोचला आहे .सातारा शहरातील सुमारे शंभरहून अधिक बचत गटांनी तयार केलेल्या फराळांना प्रचंड मागणी असून विविध फराळांचा कॉम्बो पॅक साडेबाराशे रुपयाला बाजारपेठेमध्ये उपलब्ध आहे.
सातारकरांनी यंदा प्रदूषण मुक्तीला फाटा देऊन गो ग्रीन नावाचे कमी आवाजाचे फटाके उडवण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे जास्त आवाज करणाऱ्या फटाक्यांपेक्षा पर्यावरण पूरक फटाक्यांची चलती सध्या साताऱ्यात आहे साडेपाचशे रुपयांचे कॉम्बो पॅक मधील फटाके सातारकरांना उपलब्ध होत आहेत येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तब्बल सव्वाशे पेक्षा अधिक फटाके स्टॉल असून येथे कर्जासाठी सातारकरांची गर्दी होत आहे .साताऱ्याची कापड बाजारपेठ तसेच रियल इस्टेट वाहन विश्व या तिन्ही क्षेत्रांमध्ये तेजीचे वातावरण आहे .प्राप्त माहितीनुसार बांधकाम क्षेत्रामध्ये सोमवारी आणि मंगळवारी येत्या दोन दिवसांमध्ये नवीन बारा गृह प्रकल्प लॉन्च होत असून त्याला सुद्धा सातारकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे .नवीन वाहन खरेदी विशेषता चार चाकी वाहन खरेदीला सुद्धा चांगला मुहूर्त असल्याने सातारकरांची पावले चार चाकी मानाच्या शोरूम कडे वळाले आहेत.