ध्वनिप्रदूषणाविरोधात निर्भीडपणे आवाज उठवणारे विद्यानंद बापट यांना हिरवाई पुरस्कार; रविवारी वितरण सोहळा, प्रा. संध्या चौगुले यांची माहिती

by Team Satara Today | published on : 27 November 2026


सातारा : विवेकशील विचारांचा ध्यास घेतलेले आणि सामाजिक प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणारे पुण्यातील सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांना यंदाचा १७ वा कै. पांडुरंग चौगुले स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा 'हिरवाई पुरस्कार' प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती हिरवाई संस्थेच्या अध्यक्षा संध्या चौगुले यांनी दिली. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील कर्मवीर सभागृह, यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय विदेश सेवेतील निवृत्त अधिकारी आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. ज्ञानेश्वर मुळे उपस्थित राहणार आहेत. हा पुरस्कार प्रदान सोहळा साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ यांच्या हस्ते आणि प्रमुख पाहुणे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
हिरवाई सोशल अँड एज्युकेशनल ऑर्गनायझेशनच्यावतीने सामाजिक क्षेत्रात निष्ठेने काम करणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार दिला जातो. समाजात सकारात्मक बदल घडविणाऱ्या व्यक्तींच्या कामातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, हा या पुरस्कारामागील मुख्य हेतू आहे. यंदाचे पुरस्कारार्थी विद्यानंद बापट यांनी पुण्यातील सार्वजनिक उत्सवांमध्ये होणारे ध्वनिप्रदूषण, कर्णकर्कश डीजे आणि सार्वजनिक रस्त्यावरील मंडपांमुळे रहदारीला  होणारा अडथळा, वाहतूक कोंडी आणि यातून नागरिकांना होणारा त्रास याविरोधात सातत्याने आवाज उठवला आहे.
बापट यांची भूमिका केवळ ध्वनिप्रदूषणापुरती मर्यादित नाही. कायद्याचे पालन, नागरिकांचे हक्क आणि प्रशासनाची जबाबदारी याबाबत सजग राहणे, तसेच प्रश्न सोडवण्यासाठी सनदशीर मार्गाने प्रयत्न करणे, हा त्यांच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही धर्माला किंवा सणाला विरोध करण्याऐवजी, सणांच्या नावाखाली होणाऱ्या नियमभंगाला आणि  शांततेचा भंग करणाऱ्या अतिरेकाला विरोध करणे, अशी त्यांची भूमिका आहे.
एका सामान्य नागरिकाने उपस्थित केलेला प्रश्न समाजापर्यंत पोहोचू शकतो आणि प्रशासनालाही त्याची दखल घ्यावी लागते, हे बापट यांच्या कार्यातून दिसून येते. सामाजिक प्रश्नांवर बोलण्यासाठी मोठे पद, राजकीय सत्ता किंवा संस्थेचे पाठबळ असणे आवश्यक नाही. सजगता, विवेक आणि स्वतःच्या भूमिकेवर असलेला विश्वासही महत्त्वाचा असतो, याची जाणीव त्यांच्या कामातून होते. रविवार, दि. २९ नोव्हेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता सातारा येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या कर्मवीर सभागृहात हा सोहळा होणार आहे. हिरवाई संस्थेच्या अध्यक्षा व कार्यक्रमाच्या निमंत्रक प्रा. संध्या चौगुले यांनी नागरिकांनी या सोहळ्यास उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) इंडिया लिमिटेडची एक कोटींची मदत
पुढील बातमी
महात्मा फुलेंचे चिरंतन विचार वर्तमानाशी जोडणे गरजेचे: यशेंद्र क्षीरसागर, कटगुण येथे पुण्यतिथीनिमित्त व्याख्यान

संबंधित बातम्या