सातारा : सातारा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सातत्याने गुन्हे करणारे टोळीप्रमुख संशयित जयदीप सचिन धनवडे वय 22 आणि हर्षद संभाजी साळुंखे वय 22 दोघे राहणार क्षेत्र माहुली तालुका जिल्हा सातारा यांना दोन वर्षासाठी सातारा व सांगली जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले आहेत. या प्रस्तावाची चौकशी उपविभागीय पोलीस अधिकारी राजू नवले यांनी केली होती.
या दोन सराईत गुन्हेगारांवर सातारा शहर पोलीस ठाणे येथे खुनाचा प्रयत्न करणे, जबरी चोरी, चोरी, खंडणी, दुखापत पोचवणे यांसारखे गंभीर गुन्हे दाखल होते. सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी या टोळी विरुद्ध पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर तालुका, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या तालुक्यातून दोन वर्ष तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव सादर केला होता.
या टोळीतील इसमांवर दाखल गुन्ह्यांसंदर्भात वेळोवेळी प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्यात कोणताही बदल झाला नाही. सातारा शहर परिसरातील लोकांना या टोळीचा मोठा उपद्रव होत होता. पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 नुसार सातारा जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, पुरंदर, सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस या ठिकाणावरुन दोन वर्षासाठी संबंधितांना तडीपार करण्यात आले आहे.
2022 पासून महाराष्ट्र पोलीस कारवाई 55 नुसार 30 उपद्रवी टोळ्यांमधील कलम 56 प्रमाणे 28 कलम 57 प्रमाणे 3 अशा 127 जणांना तडीपार करण्यात आले आहे. एमपीडीए कायदे अंतर्गत एका इसमावर स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली आहे. यापुढेही अशाच कडक कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी सांगितले.
या कारवाईमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, पोलीस हवालदार प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, सातारा शहर पोलीस ठाण्याचे दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी सहभाग घेतला.
सातारा, सांगली जिल्ह्यातून दोन सराईत गुन्हेगार तडीपार
by Team Satara Today | published on : 30 August 2024

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा