गरिबी, उपासमार व असुरक्षिततेच्या छायेत मातेने केला पोटच्या लेकरांचाच सौदा; मिरजेत आईने दोन मुलांना २० हजारांत विकले

by Team Satara Today | published on : 26 February 2026


मिरज : मातेच्या कुशीत सुरक्षित असणाऱ्या चिमुकल्यांचेच भवितव्य पैशांसाठी विकले गेल्याची धक्कादायक घटना मिरजेत घडली आहे. गरीब मातेने आपल्या दोन व तीन वर्षे वयाच्या दोन मुलांना प्रत्येकी २० हजार रुपयांत विकल्याचे उघडकीस आले आहे. त्यानंतर पाच दिवसांच्या नवजात मुलीलाही विकण्याचा प्रयत्न केल्याची कबुली तिने दिली आहे.

याप्रकरणी संबंधित मातेसह पाचजणांविरुद्ध मिरज शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्री केलेल्या दोन्ही बालकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मिरजेत पाठक अनाथाश्रमात दाखल केले आहे. मनीषा रोहित जाधव (वय ४१, रा. सुभाषनगर, मिरज) असे या मातेचे नाव आहे. तिचा पती रोहित हा व्यसनाधीन आहे.

कोणताही व्यवसाय किंवा रोजगार नसल्याने हे कुटुंब भीक मागून उदरनिर्वाह करते. फूटपाथवर दिवस काढते. गरिबी, उपासमार व असुरक्षिततेच्या छायेत जगताना या मातेने अखेर आपल्या पोटच्या लेकरांचाच सौदा केला. दीड वर्षापूर्वी तिने दोन वर्षांच्या मुलाला २० हजार रुपयांच्या सौद्यात विकले. याकामी महापालिकेच्या आरोग्य विभागातील सेविका सुरेखा लोंढे व उमाजी लोंढे यांनी मध्यस्थी केली.

त्यानंतर तीन वर्षाच्या दुसऱ्या बालकाचाही अशाच पद्धतीने सौदा झाला. पोलिसांनी या व्यवहारात मध्यस्थी करणारे उमाजी रमेश लोंढे, सुरेखा लोंढे, तसेच मुलांना विकत घेणारे दशरथ लोंढे व सचिन गोसावी (रा. माधवनगर) यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.      


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पक्ष संघटनेला बळकट करण्यासाठी निष्ठा, समर्पण वृत्तीने काम करेन - राष्ट्रीय अध्यक्षपदी निवडीनंतर सुनेत्रा पवार यांचा शब्द
पुढील बातमी
पुसेगावात मधमाश्यांचा विद्यार्थ्यांवर हल्ला; जखमी पाच विद्यार्थी खाजगी रुग्णालयात

संबंधित बातम्या