सातारा : सातारा जिल्ह्यात महिलांवरील वाढत्या अत्याचारांच्या निषेधार्थ सातारा जिल्हा संविधान संघर्ष समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर सोमवारी आंदोलन करण्यात आले. जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था सातत्याने ढासळत असून, महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, असा आरोप समितीच्या कार्यकर्त्यांनी करत जोरदार घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
या आंदोलनात रिपाइंचे अशोक गायकवाड, संजय गाडे, सादिक शेख, गणेश भिसे, भारत लोकरे, युवराज कांबळे, वैभव गायकवाड, सतीश गाडे, प्रशांत जगताप, विशाल भोसले, संदीप जाधव, किरण बगाडे, अझहर मणेर, रझिया शेख, कलीमुन शेख, रुखसर तहसीलदार, सोमय्या कोरबू, सायली भोसले, सुनंदा मोरे, किशोर धुमाळ, लक्ष्मी कांबळे , रमेश उबाळे, गौरी आवळे, दीपक गाडे, सुरेश कोरडे, प्रमोद क्षीरसागर सहभागी झाले होते.
यासंदर्भात प्रशासनाला देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला अत्याचारांच्या अनेक प्रकरणांमध्ये राजकीय पुढारी, कार्यकर्त्यांचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सहभाग दिसून येत आहे. वंचित घटकांवर अन्याय होत आहे. संविधानाने दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन होत आहे. राज्य महिला आयोगाच्या अनुसूचित जातीजमाती मंडळाच्या अध्यक्षपदी पक्षविरहित व्यक्तीची नियुक्ती करावी. डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणाची तटस्थ समितीकडून चौकशी करावी. या प्रकरणात पोलीस उपअधीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सिव्हिल सर्जन, डॉ. सचिन वाळुंजकर, डॉ. अंजली मोहोळकर, फलटण ग्रामीणचे पोलीस निरीक्षक यांची चौकशी करावी. दस्तगीर कॉलनीतील प्रकरणात आरोपीला पाठीशी घालणार्या शाहूपुरी पोलीस चौकीच्या अधिकार्याला बडतर्फ करावे.