नागपुरातील नंदनवन-कपिलनगरमध्ये कर्फ्यू हटला

by Team Satara Today | published on : 20 March 2025


नागपूर : मध्य नागपुरातील महाल-हंसापुरीत पसरलेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी शहरातील अकरा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कर्फ्यू लावला होता. मात्र गुरुवारी पोलिसांनी नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू हटविला तर सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुपारी दोन ते चार या कालावधीत शिथिलता दिली आहे. मात्र कोतवाली, तहसील व गणेशपेठ या तीनही पोलीस ठाण्यातील कर्फ्यू कायम ठेवण्यात आला आहे. पोलीस आयुक्तांनी हे निर्देश जारी केलेत.

सोमवारी रात्री भालदापुरा, चिटणीस पार्क, हंसापुरी या भागात जाळपोळ व हिंसाचार झाला. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून ११ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जमावबंदी लागू करण्यात आली होती. यातील बहुतांश भाग हे बाजारपेठांचे भाग म्हणून ओळखले जातात. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनादेखील अडचण होत होती. मागील तीन दिवसांपासून शांतता प्रस्थापित करण्यात पोलिसांना यश आले आहे. त्यामुळे गुरुवारी स्थितीचा आढावा घेण्यात आला. त्यानंतर नंदनवन व कपिलनगरमधील कर्फ्यू पूर्णत: हटविण्यात आला. तर परिमंडळ तीनमधील लकडगंज, पाचपावली, शांतीनगर तर परिमंडळ चारमधील सक्करदरा, इमामवाडा व परिमंडळ पाचमधील यशोधरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कर्फ्यूमध्ये शिथिलता आणण्यात आली. दुपारी दोन ते चार या कालावधीत लोक बाहेर पडू शकतात आणि या वेळेत दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची खरेदी होऊ शकते असे पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. टप्प्याटप्प्यात पुढील शिथिलता आणण्यात येणार आहे. मात्र इतवारी, महाल यासारखी प्रमुख बाजारपेठ असलेल्या कोतवाली, तहसील व गणेशपेठ पोलीस ठाण्यांतील नागरिकांना मात्र दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे हा आठवडा कर्फ्यूतच जाण्याची चिन्हे असून कोट्यवधींचे नुकसान व्यापाऱ्यांना सहन करावे लागणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शेतकऱ्यांनी शेतीसारा भरण्याचे आवाहन
पुढील बातमी
सह्याद्री कारखान्याच्या बॉयलरचा भीषण स्फोट

संबंधित बातम्या