मीठ आणि साखर हे आपल्या दैनंदिन आहारातील सर्वांत महत्त्वाचे घटक आहेत. दिवसभरात आपण जे काही खाद्यपदार्थ खातो, त्या प्रत्येकात चव आणण्यासाठी साखर किंवा मीठाचा वापर आवर्जून केला जातो. आहारातील हेच सर्वांत महत्त्वाचे घटक आपल्या शरीरातील आजारांचेही स्रोत ठरू शकतात. नुकत्याच एका अभ्यासात मीठ आणि साखरेबद्दलची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या अभ्यासानुसार, भारतातील जवळपास सर्व ब्रँडच्या साखर आणि मीठांमध्ये मायक्रोप्लास्टिक्स आढळले आहेत. ‘टॉक्सिक्स लिंक’ या पर्यावरण संशोधन संस्थेनं केलेल्या या महत्त्वपूर्ण अभ्यासात भारतातील प्रत्येक ब्रँडच्या मीठ आणि साखरेची चाचणी करण्यात आली. या प्रत्येक ब्रँडमध्ये मायक्रोप्लास्टिक्स असल्याची चिंताजनक बाब उघड झाली आहे. या संशोधनात मीठाचे दहा विविध प्रकार तपासले गेले. त्यात टेबल, रॉक, सी आणि स्थानिक प्रकारच्या मीठाचा समावेश होता. तसंच ऑनलाइन आणि स्टोअरमधून खरेदी केलेल्या पाच प्रकारच्या साखरेचं परीक्षण करण्यात आलं होतं. या संशोधनाचं निष्कर्ष अगदी स्पष्ट होतं. मीठ आणि साखरेच्या सर्व नमुन्यांमध्ये मायक्रोप्लास्टिक आढळले आहेत. यात कोणताही प्रकार किंवा ब्रँड अपवाद ठरला नाही.
अभ्यासात धक्कादायक माहिती उघड :
मीठ आणि साखरेत 0.1 ते 5 मिलिमीटर आकाराचे प्लास्टिकचे तंतू, गोळे, प्लास्टिकचा पत्रा, तुकडे यांसह लहान प्लास्टिकचे कण आढळले. विशेष म्हणजे आयोडीनयुक्त मीठ हे सर्वांत दूषित असल्याचं आढळून आलं. प्रति किलोग्रॅम आयोडीनयुक्त मिठात 89.15 मायक्रोप्लास्टिकचे तुकडे आढळले. तर सेंद्रिय रॉक सॉल्टमध्ये सर्वांत कमी 6.70 तुकडे प्रति किलोग्रॅम आढळले.
‘टॉक्सिक्स लिंक’चे संस्थापक-संचालक रवी अग्रवाल यांनी ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, “आमच्या अभ्यासाचा मूळ उद्देश हा मायक्रोप्लास्टिक्सवरील आताच्या वैज्ञानिक डेटाबेसमध्ये योगदान देणं हे होतं. जेणेकरून जागतिक प्लास्टिक करार या समस्येचं ठोस आणि योग्य पद्धतीने निराकरण करू शकेल. धोरणात्मक कारवाई सुरू करण्याचं आणि संभाव्य तांत्रिक हस्तक्षेपांकडे संशोधकांचं लक्ष वेधून घेण्याचंही आमचं उद्दिष्ट आहे. यामुळे मायक्रोप्लास्टिक्सच्या संपर्कात येण्याचा धोका कमी होऊ शकतो.”
मायक्रोप्लास्टिक्स म्हणजे काय?
मायक्रोप्लास्टिक्स हे पाच मिलिमीटर ते एक मायक्रोमीटर आकाराचे प्लास्टिकचे छोटे तुकडे असतात. प्लास्टिकच्याच मोठ्या तुकड्यांचं सतत क्षीण झाल्यानंतर त्याचं मायक्रोप्लास्टिकमध्ये रुपांतर होतं. यात दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे जे मूळ मायक्रोप्लास्टिकच्या रुपातच असते आणि दुसरा प्रकार म्हणजे मोठ्या प्लास्टिकचं हळूहळू मायक्रोप्लास्टिकमध्ये रुपांतर होतं. मायक्रोप्लास्टिक्स हे विविध आकार, रुप आणि रंगात अस्तित्त्वात असतात. ते पॉलिमरपासून बनलेले असतात.
नॅनोप्लास्टिक हे त्याहून लहान असतात. त्यांचा आकार 1000 नॅनोमीटर ते एक नॅनोमीटपर्यंत असतं. आकारामुळे ते मायक्रोप्लास्टिकच्या तुलनेत कमी समजले जातात. यामुळेच ते अधिक धोका निर्माण करतात. मायक्रो आणि नॅनो प्लास्टिक्सना एकत्रितपणे MNP असं संबोधलं जातं.
MNP कुठे आढळतात?
एमएनपी (MNP) हे आज जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात. महासागराच्या तळाशी, माऊंट एव्हरेस्टच्या शिखरावर, ध्रुवीय बर्फाच्या आत, महासागरांमध्ये, माती आणि वनस्पतींमध्ये, सर्व सागरी, सस्तन प्राणी आणि पक्ष्यांच्या, मानवी शरीराच्या आत एमएनपी आढळल्याचं अभ्यासात दिसून आलं.
कृत्रिम तंतूपासून बनवलेले कपडे, वाहनांचे टायर, अन्न आणि पाण्याचं पॅकेजिंग, सौंदर्य प्रसाधनं आणि स्कीनकेअर, औद्योगिक प्रक्रिया हे MNP चे सर्वांत मोठे स्रोत आहेत. महासागरातील सर्व MNP पैकी सुमारे 35 टक्के कपड्यांमधून येतात. हे इतके लहान असतात की भिंगाशिवाय ते पाहणं कठीण असतं.
IIT पाटणाच्या एका संशोधनात पावसाच्या पाण्यातही मायक्रोप्लास्टिकचे कण आढळून आले आहेत. त्याचप्रमाणे नद्या आणि तलावांमध्येही मायक्रोप्लास्टिक्स आढळून आल्याचं आणखी एका संशोधनातून समोर आलं आहे. कारखान्यांमधून बाहेर पडणारं सांडपाणी, शहरी भागातून बाहेर पडणारा कचरा अशा अनेक कारणांमुळे ही परिस्थिती उद्भवली आहे.
ज्या जमिनीवर शेती केली जाते, तिथेही मायक्रोप्लास्टिक मुबलक प्रमाणात आढळतं. काही संशोधनांतून असंही दिसून आलंय की जमिनीखालील भाज्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणजेच मुळा, गाजर, बटाटे यांसारख्या भाज्यांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असेल.
मानवी रक्तात आढळले मायक्रोप्लास्टिक्स
2022 मध्ये नेदरलँडच्या शास्त्रज्ञांना मानवी रक्तात मायक्रोप्लास्टिक्स सापडले होते. त्यांनी 22 लोकांच्या रक्ताचे नमुने घेऊन संशोधन केलं होतं. त्यापैकी 17 जणांच्या रक्तात प्लास्टिकचे कण आढळून आले होते. या रक्तात पाच प्रकारचे प्लास्टिक आढळले होते. यामध्ये प्रामुख्याने पॉलिमिथाईल मेथाक्रिलेट (PMMA), पॉलीप्रॉपिलीन (PP), पॉलिथिलीन (PE), पॉलिथिलीन टेरेफ्थालेट (PET) यांचा समावेश होता.
दीर्घकाळापर्यंत मायक्रोप्लास्टिक्सचं सेवन केल्यास काय होतं?
दिल्लीतील सीके बिर्ला हॉस्पीटलमधील इटर्नल मेडिसीनचे मुख्य कन्सल्टंट डॉ. नरेंद्र सिंगला यांनी स्पष्ट केलं की प्लास्टिकच्या या लहान कणांचं सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो? जेव्हा मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात प्रवेश करतात, तेव्हा आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. दीर्घकाळापर्यंत हे मायक्रोप्लास्टिक्स आपल्या शरीरात गेल्यास कालांतराने ते शरीरात जमा होऊ शकतात. त्याचे परिणाम काय होऊ शकतील ते पाहुयात..
जळजळ आणि ऑक्सिडेटिव्ह ताण: मायक्रोप्लास्टिक्समुळे शरीरातील टिश्यूजमध्ये जळजळ होऊ शकते. जेव्हा हे कण शरीरात असतात, तेव्हा ते रोगप्रतिकारक प्रतिक्रियेला उत्तेजित करतात. यामुळे जळजळ होते आणि ऑक्सिडेटिव्ह ताण येतो. हळूहळू यामुळे पेशी आणि टिश्यूजचं नुकसान होऊ शकतं. यामुळे आरोग्याच्या गंभीर समस्याही उद्भवू शकतात.
रोगप्रतिकारक शक्ती कमी होत जाते: मायक्रोप्लास्टिक्सच्या सतत संपर्कामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होऊ शकते. यामुळे शरीराला कोणतेही संक्रमण किंवा आजार होण्याची अधिक शक्यता असते. कारण रोगप्रतिकार शक्ती ही सतत या मायक्रोप्लास्टिक्सच्या कणांशी सामना करत असते.
आजारांचा धोका वाढतो: शरीरात दीर्घकाळ मायक्रोप्लास्टिक्स राहिल्यास त्यामुळे कर्करोग, गर्भधारणेच्या समस्या आणि न्यूरोलॉजिकल विकार होण्याची शक्यता असते. कारण मायक्रोप्लास्टिक्सचे हे कण हार्मोन रेग्युलेशन, सेल्युलर प्रक्रिया आणि जीन एक्स्प्रेशनमध्येही व्यत्यय आणू शकतात. यामुळे आजारांचा धोका वाढतो.
गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिस्ट्रेस: मायक्रोप्लास्टिक्सचं सेवन केल्याने जठरोगविषयक समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिडी, अस्वस्थता, अपचन यांसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
PSRI हॉस्पिटलमधील ऑन्कोलॉजी आणि हेमॅटो-ऑन्कोलॉजीचे वरिष्ठ सल्लागार डॉ. अमित उपाध्याय यांनी मायक्रोप्लास्टिक्समुळे पचनसंस्था आणि एकूणच चयापचयाला कशाप्रकारे हानी पोहोचते, याविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले “मायक्रोप्लास्टिक्स शरीरात गेल्यावर आणि आतड्यांमध्ये अडकल्यावर जळजळ होऊ शकतं. ते आतड्यांची मायक्रोबायोलॉजी बिघडवू शकतात. त्याचप्रमाणे शरीरात उपस्थित असलेले निरोगी जीवाणू नष्ट करू शकतात. यामुळे पचन समस्या आणि कर्करोगाचा विकासदेखील होऊ शकतो. नैसर्गिक उत्सर्जनाचा कोणताही मार्ग नसल्यामुळे मायक्रोप्लास्टिक्स कालांतराने शरीरात जमा होतात. ज्यामुळे आरोग्याच्या विविध समस्या निर्माण होऊ शकतात.”
मायक्रोप्लास्टिक्सचा मेंदूवर वाईट परिणाम
अमेरिकेतील ‘युनिव्हर्सिटी ऑफ रोडआयलँड’च्या संशोधकांनी मायक्रोप्लास्टिक आणि मानवी मेंदू यासंबंधीचं एक संशोधन केलं होतं. त्यात संशोधकांनी तरुण आणि वृद्ध अशा दोन गटांतील उंदरांना तीन आठवड्यांपर्यंत पाण्याद्वारे मायक्रोप्लास्टिक दिलं होतं. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ मॉलिक्यूलर सायन्स’मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार मायक्रोप्लास्टिक हे यकृत आणि मेंदूच्या उतींचं नुकसान करतंय. संशोधकांनी सांगितलं की मायक्रोप्लास्टिकची मोठी मात्राच नव्हे तर नाममात्र मात्राही शरीरात अनेक प्रकारचे बदल घडवतात. तसंच मानवी जीवनचक्रावरही परिणाम करतात.
एका वर्षात किती मायक्रोप्लास्टिक्सचं सेवन?
‘एन्व्हार्यनमेंटल सायन्स अँड टेक्नॉलॉजी’ या शोधनियतकालिकेत प्रकाशित झालेल्या शोधनिबंधातून हे उघडकीस आलंय की दरवर्षी सरासरी 39 हजार ते 52 हजार प्लास्टिकचे सूक्ष्म कण आपण सेवन करत असलेल्या पाणी, अन्न यांद्वारे माणसाच्या पचनसंस्थेमध्ये, तर 74 हजारहून अधिक कण श्वसनाद्वारे फुफ्फुसांत प्रवेश करतात. हे कण शरीराला किती घातक आहेत यावर मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे. जगभर चाललेल्या संशोधनातून असंही समोर आलंय की आता प्लास्टिकचे हे सूक्ष्मकण जगातील महत्त्वाच्या हिमनद्यांपासून ते बाटलीबंद पिण्याच्या पाण्यातदेखील सापडलेले आहेत. अमेरिकेत झालेल्या संशोधनानुसार हे उघडकीस आलंय की बीअरसारख्या पेयांमध्ये या सूक्ष्म प्लास्टिकचे साधारणपणे प्रतिलिटर चार कण सापडले आहेत. मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांपासून ते माशांमध्येही हे प्लास्टिक कण आढळून आले आहेत.
इतर पर्याय कोणते?
मीठ आणि साखरेच्या ब्रँड्सना पर्याय म्हणजे वेगवेगळ्या हर्ब्स आणि मसाल्यांचा वापर करणे. तुळस, ऑरिगॅनो, कांदा पावडर, जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा यांच्या वापराने पदार्थांमधील चव वाढू शकते. त्याचप्रमाणे नेहमीचं मीठ वापरण्यापेक्षा रॉक सॉल्टसारखे मिनरल सॉल्ट वापरल्यास त्यात समुद्री मिठाच्या तुलनेत मायक्रोप्लास्टिक्स असण्याचा धोका कमी असतो. त्याचप्रमाणे नेहमीच्या प्रक्रिया केलेल्या साखरेच्या वापराऐवजी सेंद्रिय साखरेचा पर्याय निवडू शकतो. कच्च्या किंवा कमीतकमी प्रक्रिया केलेल्या साखरेचा पर्याय निवडल्यास (उदा. टर्बिनाडो साखर) त्यात पांढऱ्या साखरेच्या तुलनेत मायक्रोप्लास्टिक्स असण्याची शक्यता कमी असते, असं डॉ, विभू कवात्रा यांनी सुचवलंय.
“प्लास्टिकचा वापर टाळा”
सलुब्रिटास मेडसेंटरच्या सल्लागार स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. नॅन्सी नागपाल सांगतात की प्लास्टिकचा वापर कोणत्याही परिस्थितीत टाळावा. “प्लास्टिकच्या ऐवजी काचेच्या किंवा धातूच्या डब्ब्यांमध्ये अन्नपदार्थ साठवणं हा मायक्रोप्लास्टिकचा संपर्क कमी करण्याचा उत्तम मार्ग आहे. ताजी फळं आणि भाज्या खरेदी करताना प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या आणि प्लास्टिक पिशव्या वापरणं टाळा. स्वयंपाक करतानाही स्वच्छता राखणं तितकंच महत्त्वाचं आहे”, असं त्या म्हणाल्या.
रेकी करून ट्रॅक्टर चोरी करणार्या आंतरजिल्हा टोळीचा पर्दाफाश |
लाडकी बहीण योजनेमुळे शरद पवारांच्या पोटात दुखतंय |
पाचगणी येथे पुरुषोत्तम जाधव यांच्या जनसंवाद यात्रेचे स्वागत |
अवैध फटाका विक्री करणार्या दोघांवर गुन्हा |
पिसाळलेल्या कुत्र्याच्या चाव्यामुळे भटक्या बैलाला रेबीजचा संसर्ग |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
सैनिकांचे प्रश्न सोडविण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच |
रचनात्मक समाजासाठी बहुआयामी व्यक्तिमत्व दिशादर्शक : अभिनेते स्वप्निल जोशी |
गोडोलीकरांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच कटिबद्ध |
घराणेशाहीची ‘पाटील’की मोडीत काढण्यासाठीच विधानसभेच्या मैदानात : पुरुषोत्तम जाधव |
खाजगी फायनान्स कंपन्यांचा मनमानी कारभार थांबवा |
लाडक्या बहीण योजनेचा महायुतीमध्ये श्रेयवाद |
दैत्यनिवारणी देवीची नवरात्रोत्सवातील शुक्रवारी बांधण्यात आलेली महापूजा |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोनजणांवर गुन्हे |
मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
एमआयडीसी परिसरातून दुचाकीची चोरी |
मसाप शाहुपुरी शाखेच्यावतीने पोवई नाक्यावर साखर वाटप |
महिला अडचणीत असताना गृह खात्याच्या झोपा |
हिंदू बहुजन सन्मान यात्रेचे सातारा शहरात उस्फुर्त स्वागत |
श्वानांचे मुखवटे झळकवून गणेश वाघमारे यांचे पालिकेसमोर आंदोलन |
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद |