सातारा: मगरींनी भरलेले चांदोलीचे धरण दीड किलोमीटर न थांबता पार करून ताडोबातून आलेल्या तारा वाघिणीने काल दिवसा ढवळा लोकांना दर्शन दिले. ताराने पाटण तालुक्यात प्रवेश केला असून ढेबेवाडी खोऱ्यातील कसणी येथे रहदारीचा रस्ता उरताना तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
तारा वाघीण सोनार्नीच्या सॉफ्ट रिलीज पिंजऱ्यातून बाहेर पडल्यानंतर शुक्रवारी तिने चांदोली धरणाच्या वसंत सागर जलाशयातून दीड किलोमीटर अंतर कापत ती झोंबी पठाराकडे आले आहे. तिला लावण्यात आलेल्या रेडिओ कॉलरच्या माध्यमातून त्याची ही वाटचाल नोंदवण्यात येत असून काल पाटण तालुक्यातील ढेबेवाडी खोऱ्यातील कसणी येथे रहदारीचा रस्ता ओलांडत असताना तिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. रस्ता ओलांडून जात असताना तारा ही वाघीण एका एसटी बसला आडवी आली त्यामुळे प्रवाशांची चांगलीच भंबेरी उडाली. रस्ता ओलांडून वाघीण नजीकच्या रूपात निघून गेल्यामुळे प्रवाशांनी सुटकेचा निश्वास सोडला. ताराच्या गळ्यातील पट्टयाला असलेल्या कॉलर रेडिओद्वारे तिच्यावर कायम देखरेख असल्याने वन्यजीव विभागाला काल सकाळी ती कसली परिसरात असल्याची माहिती होतीच त्यामुळे ती रस्ता ओलांडताना वन्यजीवचे पथकही त्या ठिकाणी तैनात होते.
सातारा- सांगली जिल्ह्याच्या सीमेलगत असलेले कसणी हे गाव सह्याद्री व्याघ्रच्या बफर झोनमध्ये समाविष्ट असुन जवळच चांदोली अभयारण्याचा परिसर आहे. अलीकडेच ताडोबामधून सुरुवातीला चंदा आणि त्यानंतर तारा वाघिणींचे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये स्थानांतर करण्यात आले आहे.