सातारा- सातारा नगर पालिका निवडणुकीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सोमवार दि. १ रोजी सकाळी ८.३० वाजता खा. उदयनराजे भोसले आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत गांधी मैदान ते पोवई नाका अशी भव्य पदयात्रा काढून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येणार आहे.
खा. उदयनराजे व ना. शिवेंद्रसिंहराजे यांच्या उपस्थितीत सोमवारी सकाळी ८.३० वाजता गांधी मैदान, राजवाडा येथून या पदयात्रेला सुरुवात होणार आहे. पदयात्रेत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अमोल मोहिते यांच्यासह नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आपल्या हजारो समर्थकांसह सहभागी होणार आहेत. पदयात्रा मोती चौक मार्गे खालच्या रस्त्याने पोवई नाका येथे जाणार आहे. शिवतीर्थ पोवई नाका येथे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन करून दोन्ही राजे नागरिकांना संबोधित करणार आहेत. या भव्य पदयात्रेत भाजपचे सर्व पदाधिकारी, सातारा पालिकेचे सर्व माजी पदाधिकारी, सर्व माजी नगरसेवक, दोन्ही राजांचे सर्व कार्यकर्ते, भाजपचे कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. या पदयात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.
प्रचारापासून अलिप्त असलेले खासदार उदयनराजे भोसले आज शेवटच्या दिवशी मैदानात उतरणार आहेत. गांधी मैदान येथून सुरू होणारे प्रचार रॅली शिवतीर्थावर समाप्त होणार आहे. याच ठिकाणी खासदार उदयनराजे व मंत्री शिवेंद्रसिंहराजे हे कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेt. पहिल्या दिवसापासूनच उदयनराजे यांनी राजकीय व्यासपीठावर कोणतेही वक्तव्य केलेले नाही. उदयनराजे प्रचारापासून लांब असल्यामुळे विरोधकांनी मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांना घेरण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला. त्यामुळे उदयनराजे उद्या काय बोलणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे.