केळघर घाटात काळा खडक येथे दरड कोसळली; मेढा-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

by Team Satara Today | published on : 06 July 2026


केळघर : मेढा-महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात असणाऱ्या 'काळा खडक' परिसरात आज दि. ६ रोजी मोठी दरड कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे या मार्गावरील वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे ठप्प झाली होती.

​घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, केळघर घाटातील मुख्य वळणावर अचानक दरड कोसळून मोठा राडारोडा रस्त्यावर आला. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी मोठा खडक आणि माती आल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि पोलीस यंत्रणा तत्परतेने घटनास्थळी दाखल झाली.

​प्रशासनाने तातडीने हालचाली करत जेसीबीच्या साहाय्याने रस्त्यावरील दरड आणि मोठा राडारोडा बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता पोलीस विभागाकडून या मार्गावरील वाहतुकीचे नियंत्रण केले जात असून, लवकरात लवकर रस्ता पूर्णपणे मोकळा करून वाहतूक पूर्ववत करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. नागरिकांनी आणि वाहनधारकांनी घाटातून प्रवास करताना काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अल्पवयीन मुलाचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा

संबंधित बातम्या