जिल्‍हा बँकेच्‍या सत्तेत्त वाई तालुक्यातील संघटनशक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी; १३४ ठरावांचे गणित महत्त्वाचे ठरणार

by Team Satara Today | published on : 13 August 2026


वाई : सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जवळ येत असताना जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणाला वेग आला आहे. ठरावांची जुळवाजुळव, मतदारसंघनिहाय समीकरणे आणि संस्थांच्या पातळीवरील संपर्क वाढला असताना वाई तालुक्यातील संघटनशक्ती चर्चेच्या केंद्रस्थानी आली आहे. माजी चेअरमन लक्ष्मणराव पाटील तात्यांनी उभी केलेली सहकारातील कार्यकर्त्यांची फळी आणि त्यांच्यानंतर मकरंदआबा पाटील व नितीनकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढे गेलेले संघटन आगामी सत्तेच्या गणितात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी एकूण १३४ ठरावांचे गणित महत्त्वाचे ठरणार आहे. त्यापैकी ५९ ठराव सोसायटी मतदारसंघातील आहे. उर्वरित ठराव बँक, प्रक्रिया, खरेदी-विक्री आणि अन्य संस्थांशी संबंधित आहेत. त्यामुळे प्रत्येक संस्थेचा ठराव आणि त्यामागील संघटन निवडणुकीत निर्णायक ठरू शकते. या पार्श्वभूमीवर वाई तालुक्यातील संस्थांशी असलेले संबंध आणि कार्यकर्त्यांची बांधणी याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

लक्ष्मणराव पाटील तात्यांनी अनेक वर्षे सहकार क्षेत्रात काम करताना कार्यकर्त्यांशी आणि विविध संस्थांशी मजबूत संबंध निर्माण केले. त्यांच्या निधनानंतर हा वारसा मकरंद आबा पाटील यांनी पुढे नेला. जुन्या कार्यकर्त्यांना सोबत ठेवतानाच नव्या पिढीला संघटनेशी जोडण्याचा प्रयत्न त्यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यामुळे तात्यांच्या काळातील ऋणानुबंध आणि सध्याची संघटनात्मक बांधणी यांचा आगामी निवडणुकीत कितपत परिणाम होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

खा. नितीन काका पाटील यांनीही जिल्हा बँकेच्या नेतृत्वात काम करताना संस्थात्मक पातळीवर आपली छाप निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेला विविध पुरस्कार मिळाल्याने सहकार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीची दखल घेण्यात आली. त्यामुळे पाटील कुटुंबीयांचा प्रभाव हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित नसून बँकेच्या कामकाजाशीही जोडला जात असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे.

आगामी निवडणुकीत विविध मतदारसंघांतील स्थानिक समीकरणे, ठरावांची संख्या, संस्थांचे मतदान आणि नेत्यांची संघटनशक्ती यावर सत्तेचे गणित अवलंबून राहणार आहे. ना. शिवेंद्रराजे भोसले आणि ना. मकरंद आबा पाटील यांची भूमिकाही त्यामुळे महत्त्वाची ठरण्याची शक्यता आहे. कोणत्या गटासोबत कोणत्या संस्था आणि ठराव राहतात, यावर निवडणुकीची दिशा स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माण-खटावच्या विकासासाठी एकजुटीने काम करुया : ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, वर्धन कारखाना कार्यस्थळावरील बैठकीत मार्गदर्शन
पुढील बातमी
सातारा शहरालगतच्या पश्चिमेकडे असलेल्या मोळाचा ओढा तिकाटण्यातील अतिक्रमणे हटवली

संबंधित बातम्या