धक्कादायक! ठोसेघर येथे आंघोळीसाठी गेलेल्या १४ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

by Team Satara Today | published on : 05 July 2026


सातारा : ठोसेघर (ता. सातारा) येथील आदर्श माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या स्वप्निल नामदेव आवकीरकर (वय १४) या विद्यार्थ्याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुर्दैवी निधन झाले. शनिवार सकाळी आंघोळीसाठी गेलेला असताना ही काळाचा घाला घालणारी घटना घडली.

​स्वप्निल हा नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी बाथरूममध्ये गेला होता. तिथे त्याला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला. हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी अत्यंत तातडीने त्याला ठोसेघर येथून सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजूभैय्या भोसले यांनीही तातडीने आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना उपचार करण्याबाबत सूचना केल्या. डॉक्टरांनी स्वप्निलला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र सर्व प्रयत्न अपुरे ठरले आणि स्वप्निलची प्राणज्योत मालवली.

​स्वप्निल हा अभ्यासू, शांत, नम्र आणि अत्यंत होतकरू विद्यार्थी म्हणून शिक्षक व मित्रपरिवारात परिचित होता. शिक्षणाची प्रचंड आवड असल्यामुळे तो दररोज आपला भाऊ श्रेयस आवकीरकर याच्यासोबत सकाळी साताऱ्यात क्लाससाठी जात असे. सकाळी ७ ते ९ या वेळेत क्लास पूर्ण करून राजवाडा येथून सकाळी ९:३० वाजताच्या बसने तो ठोसेघरला परतत असे व त्यानंतर सकाळी १०:३० वाजता विद्यालयात नियमित हजर राहत असे. शनिवारीही तो क्लासला जाण्याच्याच तयारीत होता, मात्र नियतीने त्याच्यावर अकाली झडप घातली. त्याच्या या अचानक जाण्याने ठोसेघर परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. स्वप्निलच्या पश्चात वडील नामदेव आवकीरकर, आई सुनीता आवकीरकर आणि भाऊ श्रेयस आवकीरकर असा परिवार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बलात्कार प्रकरणातील आरोपीस न्यायालयाने सुनावली २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

संबंधित बातम्या