दिल्ली : नीट पेपरफुटीच्या प्रकरणावरून दिल्लीच्या जंतर-मंतरवर गेल्या २० दिवसांपासून आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांना दिल्ली पोलिसांनी सफदरजंग रुग्णालयात दाखल केले. सोनम वांगचुक रुग्णालयात असले तरी त्यांचे आंदोलन संपलेले नाही. सोनम वांगचुक यांची पत्नी गीतांजली जे. अंगमो यांनी शनिवारी स्पष्ट केले की, वांगचुक यांचे रुग्णालयातही उपोषण सुरूच असून, आगामी २० जुलै रोजी संसदेवर निघणारा नियोजित मोर्चा ठरल्याप्रमाणेच पार पडेल. या घडामोडींनंतर सफदरजंग रुग्णालय आणि जंतर-मंतर परिसरात सुरक्षा व्यवस्था प्रचंड कडक करण्यात आली आहे.
हा लढा फक्त पेपरफुटीचा नाही; रुग्णालयाबाहेरून पत्नीचा एल्गार
सफदरजंग रुग्णालयाबाहेर पत्रकारांशी बोलताना गीतांजली अंगमो म्हणाल्या, "२० जुलैचा मोर्चा निश्चित होणार आहे. शिक्षण पद्धतीत बदल करणे ही शासन आणि धोरणकर्त्यांची जबाबदारी आहे. ही व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे, हे त्यांना सांगणे आमचे काम आहे. ही चळवळ आता केवळ पेपरफुटीपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर शिक्षण पद्धतीतील मोठ्या सुधारणांसाठीची ती एक व्यापक मोहीम बनली आहे."
त्यांनी पुढे सांगितले की, वांगचुक यांनी डॉक्टरांनी दिलेली इलेक्ट्रोलाईट पावडर घेण्यास नकार दिला असून ते केवळ मीठ आणि पाणी घेऊन उपोषण करत आहेत. बऱ्याच दिवसांपासून उपाशी असल्यामुळे ते अशक्त झाले असून त्यांचे स्नायू क्षीण झाले आहेत, परंतु मानसिकदृष्ट्या ते अत्यंत खंबीर आहेत.
वैद्यकीय अहवालांवरून संशय; रुग्णालयाच्या कारभारावर गंभीर आरोप
गीतांजली अंगमो यांनी सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांना पत्र लिहून वांगचुक यांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची मागणी केली आहे. रुग्णालयाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला. रुग्णालयाने सोनम वांगचुक यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे डिजिटल किंवा छापील रिपोर्ट्स कुटुंबाला देण्यास नकार दिला आहे. तसेच गेल्या २० दिवसांपासून वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून असलेल्या त्यांच्या खाजगी डॉक्टरांनाही रुग्णालयात त्यांना भेटू दिले जात नाही.
रुग्णालयाने वांगचुक यांची पोटॅशियम पातळी कमालीची घसरून २.९ झाल्याचे सांगितले आहे. मात्र, आदल्या दिवशी सायंकाळी ती ४.३ होती. इतक्या कमी वेळात एवढी मोठी घसरण कशी होऊ शकते? असा प्रश्न कुटुंबाने उपस्थित केला आहे. रुग्णालयाच्या पारदर्शकतेवर विश्वास नसल्यामुळे कुटुंब कोणत्याही उपचारापूर्वी दुसऱ्या प्रयोगशाळेतून स्वतंत्रपणे चाचण्या करून घेणार आहे आणि त्यानंतरच त्यांना दुसऱ्या वैद्यकीय केंद्रात हलवले जाईल असे त्यांनी सांगितले.
"न्यायालयाने रुग्णालयात भरती करण्याचे आदेश दिले नव्हते"
पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना गीतांजली म्हणाल्या की, दिल्ली उच्च न्यायालयाने वांगचुक यांच्या प्रकृतीवर नियमित लक्ष ठेवण्याचे आदेश दिले होते, रुग्णालयात डांबण्याचे नाही. त्यामुळे पोलिसांची ही कारवाई न्यायालयाच्या आदेशानुसार नाही.
डॉक्टरांचे आणि पोलिसांचे म्हणणे काय?
सफदरजंग रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चारू बांबा यांनी सांगितले की, "सोनम वांगचुक शनिवारी सकाळी ७:४० वाजता रुग्णालयात पोहोचले. प्रदीर्घ उपवासामुळे त्यांना थोडा अशक्तपणा आणि डिहायड्रेशनचा त्रास आहे, मात्र त्यांची सर्व महत्त्वाची शारीरिक लक्षणे स्थिर आहेत. त्यांच्यावर सतत लक्ष ठेवले जात आहे." तर दुसरीकडे, दिल्ली पोलिसांनी सांगितले की, वांगचुक यांची प्रकृती खालावत असल्याच्या वैद्यकीय सल्ल्यानंतर आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करूनच त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले आहे.