सातारा : तब्बल ४५ वर्षानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघाला कॅबिनेट मत्रिपदाचा मान मिळाला आहे. त्यामुळेविधानसभा मतदारसंघाचे जननायक आमदार मकरंद पाटील यांच्या दौऱ्याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघासह सातारा जिल्ह्याला आहे. बुधवार, दि. २५ रोजी मदत व पुनर्वसनमंत्री नामदार मकरंद पाटील हे सातारा दौऱ्यावर येणार असून त्यांचे जंगी स्वागत सातारा जिल्हावासियांतर्फे करण्यात येणार आहे. जिल्ह्यात आगमन झाल्यानंतर किसनवीर आबा आणि यशवंतराव चव्हाण यांना मकरंदआबा अभिवादन करणार आहेत.
वाई, महाबळेश्वर, खंडाळा विधानसभा मतदारसंघाचा कायापालट करणारे मकरंद पाटील यांनी नागपूर येथे मंत्रिपदाची शपथ घेतली. नागपूर येथील अधिवेशनाचे कामकाज पूर्ण करुन ते मुंबईला जाणार आहेत. त्यानंतर बुधवारी सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. सातारा जिल्ह्याच्या प्रवेशद्वारापासून त्यांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी ९ वाजता शिंदेवाडी येथे त्यांचे स्वागत करण्यात येणार आहे. त्यानंतर ते शिरवळ, खंडाळा, वेळे येथून कवठे येथे स्वागत स्वीकारत येणार आहे. कवठे येथे किसनवीर आबा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन ते अभिवादन करणार आहेत.कवठे येथून भुईंज, पाचवड, उडतारे, विरमाडे (आनेवाडी टोलनाका), लिंब फाटा, बॉम्बे रेस्टॉरंट चौक, उंब्रज आणि तेथून कराड येथील प्रितीसंगमावरील यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळावर अभिवादन करणार आहेत.
यशवंतराव चव्हाण आणि किसनवीर आबा यांच्या सर्वसामान्य माणुस केंद्रबिंदु मानून काम करण्याच्या विचारांनीच सातारा जिल्ह्याची वाटचाल राहिली पाहिजे, अशी भूमिका मकरंद आबांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांना अभिवादन करुनच प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. कृतीतूनच मंत्रिपदाच्या माध्यमातून जनतेची सेवा कशी करायची असते, हे ते दाखवून देतील, याची खात्री जिल्हावासियांना आहे.
जनतेला आता थेट मंत्र्यांना कामे सांगता येणार आहेत
सर्वसामान्य माणसांसाठी कायम दिवगंत खासदार लक्ष्मणराव पाटील यांच्या घराचे दरवाजे उघडे असतात, त्यांच्याच वारसाला राज्याचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाल्याने जिल्हावासियांच्या मनात वेगळाच आनंद आहे. सर्वसामान्य जनतेला आता थेट मंत्र्याला भेटून आपली कामे सांगता येतील आणि ती करुनही घेता घेतील याची खात्री असल्याने सर्वसामान्य जनतेने आबांचे स्वागत उत्स्फूर्तपणे करण्याचा निर्णय घेतल आहे. आबांच्या आगमनाची उत्सुकता सर्वसामान्य जनतेला मोठ्या प्रमाणावर आहे.