सातारा : मी खासदार उदयनराजे भोसले बोलतोय, असा चक्क फोन बॉलीवूड अभिनेते आमिर खान यांना करणार्या पुणे येथील भामट्याच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर समर्थक पंकज चव्हाण यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. या भामट्याच्या शोधार्थ पोलिसांचे एक पथक रवाना झाल्याची माहिती मिळत आहे.
याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, फिर्यादी पंकज चव्हाण यांचे पाचगणी येथील निकटवर्तीय यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्याकडून अभिनेते आमिर खान यांना भेटायचे आहे काय, अशी चौकशी केली. चव्हाण यांनी या प्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी अशी कोणतीही भेट घेणार नसल्याचे स्पष्ट केले. काही मोबाईल नंबर वरून आमिर खान यांना फोन झाले होते. हे समजताच पंकज चव्हाण यांनी तातडीने शाहूपुरी पोलीस स्टेशन येथे जाऊन या तोतया इसमाच्या विरोधात तक्रार दिली. पुणे येथील या भामट्याची तोतयेगिरी आमिर खान यांचे सहाय्यक बॉबी यांच्याशी चर्चा केल्यानंतर चव्हाण यांच्या लक्षात आली.
मी उदयनराजे भोसले बोलतोय माझ्या मित्राला तू भेटणार होतास, त्याच्या कामाचे काय झाले ? तुझ्या मॅनेजर शी बोलून घे त्याचे काम करून दे. अशा चर्चा या तोतया इसमाने केल्याचे फिर्यादी च्या जवाबात नमूद आहे.
13 जानेवारी 2025 ते 14 जुलै 2025 पर्यंत या तोतयाने वेळोवेळी आमिर खान यांच्याशी तीन विविध क्रमांकाच्या मोबाईल वरून संपर्क केला. तसेच त्याने मुंबई येथे आमिर खान यांची जाऊन भेटही घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे शाहूपुरी पोलीस स्टेशनच्या विरोधात या तोतयाच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याच्या शोधात आहेत.