सातारा : संकलन यादी अद्ययावत करून प्रलंबित पुनर्वसन प्रस्ताव थेट मंत्रालयात पाठवून त्याबाबत येत्या पंधरा दिवसात त्याचा तात्काळ पाठपुरावा करण्यात येईल, असे स्पष्ट आश्वासन अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांनी शुक्रवारी तारळे धरणग्रस्तांना दिले. त्यामुळे गेल्या पाच दिवसापासून धरणग्रस्तांचे सुरू असलेले चक्री उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती श्रमिक मुक्ती दल संघटनेचे नेते डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी दिली आहे.
तारळे धरणग्रस्तांच्या संदर्भात संकलन यादी चुकीची झाली आहे. तसेच वाढीव क्षेत्राच्या संदर्भात गावठाणाच्या सुविधा मिळालेल्या नाहीत. गेली 27 वर्ष हा प्रश्न प्रलंबित असून राज्य शासन या पुनर्वसनाच्या मागण्यांना वाटाण्याच्या अक्षता लावत आहे, असा आरोप करत डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी तारळे क्षेत्रातील सुमारे 55 खातेदारांच्या सह येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर चक्री उपोषण सुरू केले होते. गेल्या पाच दिवसापासून धरणग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठिय्या दिला होता.
शुक्रवारी अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे यांच्या दालनात डॉक्टर प्रशांत पन्हाळकर आणि तारळे धरणग्रस्तांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये 1997 ची बंदी दिनांक गृहीत धरून संकलन यादी अद्ययावत करणे, तसेच प्रलंबित प्रस्ताव तातडीने मंत्रालयात पाठवणे, त्या प्रस्तावांचे तांत्रिक निकष तपासून त्यांना मान्यता देणे, महिन्यातून एकदा धरणग्रस्तांची आढावा बैठक घेणे, गावठाणांच्या सुविधांसंदर्भात महसूल विभागाला योग्य त्या सूचना देणे अशा विविध विषयांवर महत्त्वपूर्ण चर्चा होऊन संबंधित यंत्रणांना निर्देश दिले जातील, अशी ग्वाही जीवन गलांडे यांनी दिली. यासंदर्भात प्रशांत पन्हाळकर यांनी या बैठकीला सकारात्मक प्रतिसाद दिला व तारळे धरणग्रस्तांनी या उपोषणातून तात्पुरती माघार घेतली आहे. या संदर्भात राज्य शासनाने तातडीने पुढील कारवाई केली नाही तर पुन्हा आंदोलनाचा योग्य तो मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा डॉक्टर प्रशांत पन्हाळकर यांनी दिला आहे.