मेढा : जावळी तालुक्यातील शिंदेवाडी (पो. दापवडी) येथे भरदिवसा एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी पावणेतीन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये सोन्याचे दागिने आणि रोख रकमेचा समावेश असून, या धाडसी चोरीमुळे परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे. याप्रकरणी मेढा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेढा पोलीसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, शिंदेवाडी येथील रहिवासी मंगेश गोविंद शिंदे (वय ४५) हे पाचगणी येथील संजीवन हायस्कूलमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. नोकरी सांभाळून ते 'सद्गुरु केटरर्स' या नावाने स्वतःचा व्यवसायही चालवतात. काल, गुरुवार दि. २१ मे रोजी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शिंदे आणि त्यांची पत्नी नेहमीप्रमाणे पाचगणी येथे कामावर गेले होते. त्यानंतर सकाळी १० वाजता त्यांचे लहान भाऊ आणि भावजय शेतात निघून गेले. घरात केवळ त्यांचे वृद्ध वडील आणि मुलगी स्नेहल हे दोघेच होते. सकाळी ११ वाजता वडील गावात फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले, तर मुलगी स्नेहल घराच्या दोन्ही दरवाजांना व्यवस्थित कुलूप लावून कॉलेजचा ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी पाचगणीला गेली.
काही वेळातच, म्हणजेच ११:५६ वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारून वडील परत आले असता, त्यांना घराचा मुख्य दरवाजा उघडा दिसला. त्यांनी तातडीने फोन करून स्नेहलला विचारणा केली. आपण घर व्यवस्थित कुलूप लावून बंद केले होते, असे स्नेहलने सांगताच सर्वांचे पाय गळाले. स्नेहलने तात्काळ ही माहिती तिचे वडील मंगेश शिंदे यांना दिली.
घरी चोरी झाल्याची शंका आल्याने मंगेश शिंदे आणि त्यांची मुलगी पाचगणीवरून तातडीने मोटरसायकलवरून शिंदेवाडी येथील घरी पोहोचले. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता बेडरुममधील प्लायवूडच्या शोकेसच्या कपाटाचा दरवाजा उघडा होता आणि आतील ड्रॉवरची मोडतोड करून सर्व साहित्य जमिनीवर अस्ताव्यस्त फेकलेले दिसले. कपाटातील लॉकरची तपासणी केली असता, त्यातील मौल्यवान ऐवज गायब झाल्याचे समोर आले.