मुंबई : यंदा मान्सून ४ जून २०२६ रोजी केरळमध्ये दाखल झाला. केरळ व कर्नाटक किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला, तर गोव्यात ५ जून रोजीच तो पोहोचला. मात्र, दक्षिण कोकणात पोहोचल्यानंतर त्याची गती मंदावली. पश्चिम किनारपट्टीवर मान्सूनची उत्तर सीमा गेल्या चार दिवसांपासून हर्णेमध्ये रेंगाळली आहे.सामान्यतः केरळमधील आगमनानंतर सुमारे १० दिवसांत मुंबईत मान्सून दाखल होतो. यंदा नियमित तारीख ११ जून होती, परंतु प्रत्यक्षात लक्षणीय विलंब झाला आहे.
मान्सूनची गती ६ जूनपासून संथ झाली असून, तो सध्या कोकणात अडकला आहे. भारतीय हवामान विभाग (IMD) ने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, पुढील चार ते पाच दिवसांत परिस्थिती अनुकूल होऊन मान्सून महाराष्ट्रासह विविध राज्यांमध्ये पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र, मुंबईत त्याच्या पूर्ण आगमनासाठी २० जूनपर्यंत वाट पाहावी लागण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
IMD च्या रविवारी (१४ जून) प्रसिद्ध केलेल्या बुलेटिननुसार, मान्सूनची उत्तर सीमा (Northern Limit of Monsoon) अजूनही १८°N/६०°E, १८°N/६५°E, १८°N/७०°E, हरणाई, सोलापूर, हैदराबाद, भद्राद्री कोथागुडेम, कलिंगपट्टणम, पारादीप, बारीपदा, पुरुलिया, धनबाद, मुझफ्फरपूर आणि २८.३°N/८३°E या भागांतून जात आहे.
हवामान विभागाने स्पष्ट केले आहे की, पुढील ४-५ दिवसांत मान्सून महाराष्ट्राच्या आणखी काही भागांत, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे.