सातारा: सातारा शहराच्या उपनगरात एका २३ वर्षीय तरुणीचा विनयभंग करून तिला शारीरिक इजा पोहचवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित अमर सीताराम मतकर (रा. सातारा) याच्याविरुद्ध सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ मे रोजी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही आपल्या अपार्टमेंटसमोरील रस्त्यावरून जात असताना संशयित अमर मतकर याने तिला अडवले. संशयिताने तरुणीचा टी-शर्ट पकडून तिला रस्त्यावर पाडले आणि फरफटत ओढत नेऊन गैरवर्तन केले. यावेळी त्याने पीडितेच्या डाव्या खांद्यावर आणि डाव्या मांडीवर जोरात चावा घेतला. तसेच तिला मिठी मारून विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत तरुणीच्या उजव्या हाताला ओरबडल्याने ती जखमी झाली आहे.
हा सर्व प्रकार सुरू असताना परिसरातील जागरूक नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. नागरिकांनी तातडीने धाव घेत तरुणीची नराधमाच्या तावडीतून सुटका केली. संतापलेल्या जमावाने संशयित आरोपीला जागीच चांगलाच चोप दिला आणि त्यानंतर त्याला शहर पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. स्वतःच्या वर्तनाने तरुणीच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे पीडितेने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी संशयित अमर मतकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ आणि ११५(२) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जैस्वाल या करत आहेत. साताऱ्यासारख्या शहरात भररस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.