वाई : विकासकामांच्या नावाखाली वृक्षतोडीचे प्रमाण वाढत असताना वाई सार्वजनिक बांधकाम विभागाने पर्यावरण रक्षणाचा आदर्श घालून दिला आहे. येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामात अडथळा ठरणारी तब्बल २८ मोठी झाडे तोडण्याऐवजी त्यांचे जेसीबी आणि पोकलेन यंत्रांच्या साहाय्याने वाई-सातारा रस्त्याच्या कडेला यशस्वीरीत्या शास्त्रोक्त पुनर्रोपण करण्यात आले आहे.
येथील अतिरिक्त जिल्हा न्यायालयाच्या नवीन इमारतीचे काम सध्या वेगाने सुरू आहे. नियोजित इमारतीच्या जागेत आवारातील काही जुनी आणि मोठी झाडे नजीकच्या काळात अडथळा ठरणार होती. प्रशासनाने वृक्षतोडीचा सोपा मार्ग निवडण्याऐवजी त्यांचे पुनरुज्जीवन करण्याचा पर्यावरणपूरक निर्णय घेतला.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता महेश गोंजारी यांच्या संकल्पनेतून ही पर्यावरणपूरक मोहीम हाती घेण्यात आली. यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर आणि शासकीय परवानग्या मिळवण्यात आल्या. ही अवाढव्य झाडे मुळासकट सुरक्षितपणे काढण्यासाठी आणि ती दुसऱ्या ठिकाणी वाहून नेण्यासाठी जेसीबी आणि पोकलेनसारख्या अवजड यंत्रांची मदत घेण्यात आली. वृक्षांचे नुकसान होऊ नये, म्हणून या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या पथकाचे मार्गदर्शन लाभले.
झाडांच्या मुख्य मुळांना आणि संवेदनशील भागाला कोणतीही इजा न पोहोचवता ही झाडे काळजीपूर्वक जमिनीबाहेर काढण्यात आली. वाई-पाचवड सातारा रस्त्याच्या दुतर्फा शास्त्रीय पद्धतीने मोठे खड्डे तयार करण्यात आले. त्यात आवश्यक खत आणि औषधांची प्रक्रिया करून या सर्व २८ झाडांचे यशस्वीरीत्या पुनर्रोपण करण्यात आले. प्रशासनाचा संवेदनशील दृष्टिकोन आणि तज्ज्ञांचे अचूक नियोजन यामुळे २८ झाडांना जीवदान मिळाले आहे. विकास आणि पर्यावरण यांचा सुरेख मेळ घालणाऱ्या या यशस्वी उपक्रमाचे पर्यावरणप्रेमींकडून कौतुक होत आहे.